मागील वर्षीप्रमाणेच यंदाच्या होळीवरदेखील कोरोनाचे सावट असून हा सण साधेपणात साजरा करण्याचे आवाहन शहर देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे. बेळगाव शहरात प्रत्येक गल्लीत होळी कामन्नाची मूर्ती असल्याने गल्लीत या मूर्तीसमोर सार्वजनिक होळी पेटविली जाते.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून प्रशासनाने पूर्वखबरदारी म्हणून कोविड मार्गसूचीदेखील जाहीर केली आहे. त्यामुळे याची दखल घेऊन हा उत्सव आपापल्या घरीच साजरा करावा. गल्लोगल्ली एकत्र येणे टाळावे, असे आवाहन शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील व सेक्रेटरी परशराम माळी यांनी केले आहे.
धुळवडीला सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पथके तयार केली आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे संसर्ग रोखण्यासाठी होळीनिमित्त नागरिक एकत्र येण्याच्या शक्यतेने शहरात सर्वत्र पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त ठेवली जाणार असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करू नये यासाठी पोलिसांनी नागरिकांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांना खासगीत होळी पूजन करता येईल. मात्र त्या ठिकाणी अधिक लोक एकत्र आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन करोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करण्यात आले आहे. परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मार्गसूचीमधील नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे. नागरिकांनी याबाबतीत जबाबदारीने वागावे, असे आवाहन करण्यात येत आहे.