हलगा गावातील रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या दलित युवकावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधितांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा, अशी मागणी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हलगा येथे मित्र आणि काही नातेवाईकांनी आपल्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. वाढदिवस साजरा करण्यात येत असता १५ – २० जणांच्या समूहाने अचानक आपल्यावर हल्ला केला. जातीवाचक शिवीगाळ केली.
अशी माहिती तक्रारदार युवकाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. आपल्याला घरी जाण्यास सांगितले आणि त्यानंतर घरासमोर येऊन देखील अर्वाच्च शब्दात आणि जातीवाचक शिवीगाळ केली. आपल्यासोबत त्यावेळी मित्र, कुटुंबातील सदस्य देखील होते. या सर्वाना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली.
त्यानंतर पुन्हा काहीजण यामध्ये सामील झाले आणि पुन्हा जातीवाचक शिवीगाळ केली. जवळपास ४३ जणांचा समूह यावेळी होता. या सर्वांवर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांना देण्यात आले आहे.
यावेळी तक्रारदार युवक आणि त्याच्या कुटुंबियांसमवेत दलित समाजाचे प्रमुख गंगाधर दोडमनी, दलित नेते मल्लेश चौगुले, सिद्राय मेत्री, रमेश वडगावी, अरुणा वडगावी, प्रकाश मातंगी, नितीन वडगावी आदी उपस्थित होते.