एरव्ही अंगणात घरात झाडावर चिवचिवाट करणाऱ्या चिऊताईचे आत्ता दर्शन मिळणेही दुर्लभ झाले आहे.
शहरातील वाढती सिमेंटची जंगले आणि ग्रामीण भागात होणारी वृक्षतोड यामुळे चिऊताई दिसेनाशी झाली आहे. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या घटत चालली असल्याचे दिसत आहे.
चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा ऐकण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत जायंट्स मेनचे पदाधिकारी आणि पक्षीप्रेमी अविनाश पाटील यांनी मांडले आहे.
आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. आपल्या किलबिलाटानं आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व अन् वैभव जपणं म्हणूनच गरजेचं आहे.
नाही तर उद्याच्या पिढीला पुस्तकातून ‘एक होती चिऊताई’ असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या अंगणात, बागेत,गच्चीवर पक्षांसाठी खायला दाणे आणि पिण्यासाठी पाणी ठेवण्याचा संकल्प करावा जेणेकरून चिमण्यांच्या आयुष्यात आंनद तर भरेलच आणि आपलं आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात त्यांच्या किलबिलाटाने ताणतणाव दूर होतील असेही ते म्हणाले.
आगरकर रोड,टिळकवाडी येथील रहिवासी असलेल्या अविनाश पाटील यांनी गेल्या दहा वर्षांपासून गोखले अपार्टमेंटमधील आपल्या फ्लॅटच्या गॅलरीत पक्षांसाठी खाऊ आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून दररोज तिथे वेगवेगळे पक्षी येत असतात, त्यांना पाहून आमच्या संपुर्ण कुटुंबाला एक वेगळाच आनंद मिळतो असेही ते सांगतात.
जायंट्सच्या माध्यमातून सामाजिक सेवेचे व्रत घेतलेल्या अविनाश पाटील हे फक्त पक्षीप्रेमीच नसून भटक्या कुत्र्यांसाठी मांजरांसाठीपण ते खाऊ आणि पाण्याची व्यवस्था करत असतात.यांच्या या कार्याचे अनुकरण प्रत्येकाने केले तर नक्कीच पुन्हा सगळीकडे चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येईल.