शेतात गांजाचे पीक घेत असल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळे एका आरोपीला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड सुनावला आहे.
मौलानासाब इमामसाब नदाफ उर्फ पिंजार (वय 55, रा. बळवाड, ता. अथणी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नांव आहे. मौलानासाब याने आपल्या शेतातील उसाच्या फडामध्ये गांजाचे पिक घेतले होते. याबाबतची माहिती मिळताच डीसीआरबी पोलिसांनी तत्कालीन सीपीआय शंकरगौडा व्ही. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 जून 2017 रोजी सकाळी 7 वाजता बळवाड येथे गांजा पिकवलेल्या शेतात धाड टाकली. या कारवाईप्रसंगी पोलिसांनी 15 किलो वजनाची गांजाची 7 झाडे, त्याचप्रमाणे तत्पूर्वी काढून वाळवून ठेवलेला 24 किलो गांजा जप्त केला. या संपूर्ण गांजाची बाजारपेठेतील किंमत 2 लाख 88 हजार रुपये इतकी होते.
याप्रकरणी मौलानासाब नदाफ याच्याविरोधात अथणी पोलिस स्थानकामध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर येथील दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
न्यायालयांमध्ये एकूण आठ साक्षी, 28 कागदपत्री पुरावा आणि मुद्देमाल तपासण्यात आला. यामध्ये मौलानासाब दोषी आढळून आल्यामुळे न्यायाधीश जी नंजुडय्या यांनी त्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड. जी. के. माहुरकर यांनी काम पाहिले.