कित्तूर राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालयातील ‘शौर्य’ या वाघाला रेंज वन अधिकारी श्रीनाथ मनोहर कडोलकर यांनी दत्तक घेतले आहे. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हा आदर्श निर्णय घेतला असून एक वर्षासाठी त्यांनी शौर्याला दत्तक घेतले आहे.
भूतरामनहट्टी येथील प्राणिसंग्रहालयाचे काम युद्ध पातळीवर सुरु असून नुकतेच या प्राणिसंग्रहालयात विविध प्राणी दाखल झाले आहेत. लवकरच जनतेसाठी हे प्राणिसंग्रहालय खुले करण्यात येणार आहे. या प्राणिसंग्रहालयात दाखल झालेल्या प्राण्यांच्या देखभालीसाठी प्रशासनाला खूप मोठा खर्च पेलावा लागतो.
प्राणिसंग्रहालयाला भेट देण्यासाठी येणाऱ्या जनतेकडून प्रवेश शुल्क आकारण्यात येतो. प्रवेश शुल्क आणि प्राण्यांच्या देखभालीवर तसेच प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनावर होणार खर्च यातून खूपच कमी उत्पन्न मिळते. शिवाय प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आहारावर आणि देखभालीवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. याचा विचार करून गोळीहळ्ळी रेंजचे रेंज वनाधिकारी श्रीनाथ मनोहर कडोलकर यांनी शौर्य या वाघाला एक वर्षासाठी दत्तक घेतले आहे.
आपल्या लग्नाच्या वाढसीवसाचे औचित्य साधून त्यांनी हा निर्णय घेतला असून या वाघाच्या एक वर्षाच्या देखभालीसाठी आणि आहाराचे नियोजन यांच्यामार्फत काण्यात येणार आहे. कित्तूर राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालयातून प्राणी दत्तक घेणारी हि पहिली व्यक्ती ठरली असून त्यांच्या या आदर्श निर्णयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
श्रीनाथ कडोलकर यांच्या निर्णयाचे बेळगाव प्राणिसंग्रहालयाने कौतुक केले आहे. शिवाय वन्यजीव संवर्धनाच्या उदात्तकरणासाठी कडोलकर यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.