कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात यंदा दहावीची परीक्षा मार्चऐवजी जून महिन्यात होणार असून शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या अंतिम वेळापत्रकानुसार ही परीक्षा येत्या 21 जून ते 5 जुलै 2021 या कालावधीमध्ये होईल, अशी माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.
कोरोनामुळे यावर्षीची दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. याआधी सदर परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच त्यावर आक्षेप अथवा सल्ले मागविण्यात आले होते. त्यांचा विचार करूनच परीक्षेची अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, असे शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले.
सदर परीक्षादेखील कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे तंतोतंत पालन करून सामाजिक अंतर राखून घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यंदाच्या दहावी परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 21 जून :प्रथम भाषा -मराठी, हिंदी, कन्नड, तामिळ, उर्दू, संस्कृत, तेलगू . 24 जून : गणित. 28 जून : विज्ञान. 30 जून : तृतीय भाषा -हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, पर्शियन, अरेबिक, कोकणी, संस्कृत, तुळू. 2 जुलै : द्वितीय भाषा -इंग्रजी /कन्नड, 5 जुलै : समाज शास्त्र.