वृद्धापकाळात कोणीच नातलग नसल्यामुळे असहाय्य अवस्थेत जीवन कंठणाऱ्या एका वृद्ध महिलेला स्थानिक नागरिकांच्या विनंतीवरून आसरा मिळवून देताना फेसबुक फ्रेंड्स सर्कलने तिला करूणालय निवारा केंद्रात दाखल केले आहे.
सदर वृद्ध महिलेचे नांव शोभा श्रीपादराव कुलकर्णी असे असून 65 वर्षे ओलांडलेल्या शोभा भाग्यनगर पहिला क्रॉस येथे भाड्याच्या घरात राहत होत्या. पूर्वी शोभा यांची अविवाहित मोठी बहीण त्यांची काळजी घेत होती. भाग्यनगर येथे एकाच खोलीत या दोघी राहत होत्या. कांही वर्षांपूर्वी मोठ्या बहिणीचे निधन झाल्यानंतर शोभा कुलकर्णी एकाकी पडल्या होत्या. दिवसेंदिवस वय होत चालले असल्यामुळे त्यांच्याकडे कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नव्हते.
शोभा या अधिकच वयोवृद्ध होत चालल्या असल्यामुळे आसपासच्या लोकांना त्यांना मदत करणे कठीण जात होते. तेंव्हा त्यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्याशी संपर्क साधून संबंधित महिलेला मदत करण्याची विनंती केली.
संतोष दरेकर यांनी आज मंगळवारी आपले सहकारी निवृत्त जवान प्रकाश मजुकर यांच्या मदतीने शोभा कुलकर्णी यांना त्यांच्या पुढील देखभालीसाठी नावगे क्रॉस, जांबोटी रोड येथील करूणालय या निवारा केंद्रामध्ये रीतसर दाखल केले.
याप्रसंगी शोभा यांचे शेजारी समीर बाळेकुंद्री, मुबारक ताशिलदार, ज्योतिबा बिर्जे, जयश्री कुलकर्णी आदींसह करूणालयाचे सदस्य उपस्थित होते. वृद्ध शोभा कुलकर्णी यांची पुढील सोय लावून दिल्याबद्दल त्यांच्या शेजाऱ्यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे आभार मानले आहेत.