देशातील जनतेला अच्छे दिन दाखविण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कष्टप्रद दिन दाखवत आहेत, असा आरोप कर्नाटक राज्य रयत संघ -हसिरू सेनेचे राज्याध्यक्ष चुनप्पा पुजारी यांनी केला आहे.
गोकाक येथील सरकारी विश्रामधाम येथे आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्वी जर खरोखर चहा विकत असते तर आज शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची ही वेळ आली नसती. चहा विकणाऱ्याला चहा उत्पादनामागील कष्ट माहित असतात, शेतकऱ्यांचा संघर्ष माहित असतो. देशातील जनतेला अच्छे दिन येतील या आशेपोटी आम्ही भाजपला आमची मते दिली होती. परंतु आमच्यावर आज अच्छे ऐवजी समाधी दिनाची वेळ आली आहे, असे पुजारी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी विरोधी कायदे अंमलात आणले आहेत. त्यामुळे मोदींकडून शेतकऱ्यांचे भले होईल असे वाटत नाही. बेळगावमध्ये येत्या 31 मार्च 2021 पासून आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये राज्यातील सर्व शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत.
त्यावेळी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शेतकऱ्यांनी मतदान करायचे की नाही आणि केले तर भाजप विरोधी करायचे का? अथवा शेतकरी विरोधी कायदे अंमलात आणणाऱ्या पक्षासाठी पोटनिवडणुकीत नोटा मताचा अवलंब करायचा का? याबाबत विचार विमर्श केला जाईल, असेही चुनप्पा पुजारी यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस रयत संघाचे गोकाक तालुका अध्यक्ष मंजू पुजेरी यांच्यासह अन्य शेतकरी नेते उपस्थित होते.