केंद्र सरकारने अंमलात आणलेले तीन कृषी कायदे, राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याबरोबरच बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास रद्द व्हावा या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी रयत संघटना आणि हरित सेनेतर्फे गुरुवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे धरणे आंदोलन छेडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
रयत संघटनेचे राज्य संचालक गणेश इळीगेर, रयत संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सत्याप्पा मल्लापुरे, बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे, अथणी तालुका कार्याध्यक्ष रमेश मडिवाळ, कित्तूर तालुका अध्यक्ष कुबेर गाणगेर यांच्या नेतृत्वाखाली 4 रोजीच्या धरणे आंदोलनाची पूर्व कल्पना देणारे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना सादर करण्यात आले.
कर्नाटक राज्य रयत संघटना-हरित सेना माध्यमातून राज्याध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांच्या मुख्य उपस्थितीत बेळगाव जिल्ह्यातील सर्व रयत संघटनेतर्फे हजारो शेतकरी बैलगाड्या व आपल्या कुटूंबियांसह गुरुवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता बेळगावमधील कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे धरणे धरुन नंतर बेळगाव जिल्हाधिकार्यांना मोर्चाने निवेदन देतील. केंद्र, राज्य सरकारचे शेतकरी विरोधी कायदे आणि बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास ताबडतोब रद्द करुन प्राणपणाने लढणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसह अन्य कांही मागण्यासंदर्भात हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात बायपासमधील समस्त शेतकऱ्यांसह ज्या इतर शेतकऱ्यावर अन्याय झालाय त्या शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे.
सदर मोर्चा व धरणे सत्याग्रहाच्या आंदोलनात अथणी, गोकाक, बैलहोंगल, चिक्कोडी, कित्तूर, रायबाग तसेच संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून भाषा,जात,पंथ,पक्ष विसरुन एकत्रित येणाऱ्या शेतकऱ्यांकडून केंद्र तसेच राज्य सरकारला इशारा देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर बेळगावमधे येत्या 31 मार्च रोजी संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांची सभा आयोजित करण्यासंदर्भात यावेळी चर्चाही होणार आहे. तेंव्हा सर्व शेतकरी संघटनांनी म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन गुरुवारचे धरणे आंदोलन यशस्वी करत राकेश टिकैत यांच्या सभेला लाखोच्या संख्येने उपस्थितीत राहण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न सुरु करण्यासाठी आंदोलनात हजारोंच्या संख्येने हजर रहावे, असे आवाहन बेळगाव जिल्हा आणि तालुका रयत संघटना-हरित सेनेतर्फे करण्यात आले आहे.