अबकारी खात्याची तगडी फिल्डिंग! विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत लाखोंचा माल जप्त!-अबकारी खात्याने लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी दारूची बेकायदा वाहतूक व निर्मिती रोखण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल 20 लाख 74 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अबकारी खात्याने 134 ठिकाणी केलेल्या कारवाईत 20 लाख 74 हजारचा मुद्देमाल जप्त करुन 34 जणांना अटक केली आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिडणुकीची घोषणा होताच मतदारसंघाच्या व्याप्तीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आदेशानुसार आवश्यक ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.
बेळगाव जिल्ह्यात अबकारी खात्याकडून बेकायदा मद्य वाहतूकीवर करडी नजर ठेवण्यात आली आली आहे. 16 मार्च ते 26 मार्चपर्यंत 134 ठिकाणी छापे टाकून 45 अबकारी प्रकरणांची नोंद केली आहे. या कारवाईत 3098.57 लिटर मद्यसाठा, 40 लिटर गावठी दारु, 4 दुचाकी, 1 टँकर, 1 ट्रक जप्त करण्यात आला आहे, तसेच ३४ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अबकारी उपायुक्तांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबकारी खात्याने नऊ विशेष भरारी पथकांची स्थापना केली आहे. अबकारी उपायुक्तांच्या नेतृत्वामध्ये 1, उपअधीक्षकांच्या नेतृत्वामध्ये 2, व निरीक्षकांच्या नेतृत्वामध्ये 6 अशा 9 फिरत्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलेल्या 27 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक पोलिस स्थानकाता अबकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.