बेळगाव शहर परिसरात काल पडलेल्या वादळी वाऱ्यासह दमदार पावसामुळे तुंबलेल्या ड्रेनेज आणि गटारीचे सांडपाणी व केरकचरा रस्त्यावर आल्यामुळे शहराच्या पूर्वेकडील बी. एस. येडियुरप्पा मार्ग संपूर्णपणे अस्वच्छ होऊन त्याची दुर्दशा झाली आहे. दरवर्षी या मार्गावर हा प्रकार घडत असल्याने याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
काल बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे ड्रेनेज आणि गटारीच्या पाण्यासह मोठ्या प्रमाणात केरकचरा शहराच्या पूर्वेकडील भागात असणाऱ्या बी. एस. येडियुरप्पा मार्गावर पसरला आहे. त्यामुळे सदर रस्त्याची एक बाजू काळ्याशार सांडपाणी आणि कचऱ्याने व्यापले असून यामुळे या मार्गावर दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
रस्त्यावर घाण सांडपाणी आणि केरकचरा पसरला असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आज सकाळी पहावयास मिळत होते. विशेषता दुचाकी वाहन चालक सांडपाणी आणि केरकचरा टाळून वाहने हाकताना दिसत होते. सध्या या रस्त्यावर पसरलेल्या सांडपाणी आणि केरकचऱ्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरून जावे लागत आहे.
बी. एस. येडियुरप्पा मार्गाच्या ठिकाणी असलेले ड्रेनेज आणि गटारीचे काम व्यवस्थितरीत्या पूर्ण करण्यात आलेले नाही. जुने बेळगाव परिसरातील गटारी येडियुरप्पा मार्गावरील ड्रेनेजला जोडलेल्या आहेत.
मात्र या ठिकाणी सांडपाण्याचा निचरा होण्यास पुढे मार्ग नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणची गटारे आणि ड्रेनेज तुंबून सांडपाणी संपूर्ण रस्त्यावर पसरत असते. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील ड्रेनेज आणि गटारींची वेळच्या वेळी साफ सफाई करण्याबरोबरच या ठिकाणचे सांडपाणी तुंबणार नाही यादृष्टीने उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.