हॉस्पिटलवरील हल्ल्याप्रकरणी रुग्णांवरील शस्त्रक्रियेच्या मुद्द्यावरून दुर्लक्षपणाचा जो आरोप करण्यात आला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. संबंधित रुग्णाच्या बाबतीत कांहीही चुकीचे झालेले नसून रुग्णाचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे, एवढेच लक्षात घेऊन आपण सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याचे स्पष्टीकरण डॉ. रोहित जोशी यांनी दिले आहे.
आयएमए बेळगावतर्फे आज सकाळी हॉटेल मिलन समोरील आयएमए सभागृहात आज सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मारुती गल्ली येथील आपल्या हॉस्पिटलमध्ये घुसून संतप्त जमावाने केलेली नासधूस आणि आपल्यावर केलेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना डॉ. रोहित जोशी यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले.
संबंधित रुग्ण गेल्या 20 फेब्रुवारी रोजी आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर 21 तारखेला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचे पोट फुगून शौचाची वाट बंद झाली होती अशा स्थितीत रुग्णाचा जीव वाचवणे महत्त्वाचे असल्यामुळे शस्त्रक्रिया गरजेची होती. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांना संपूर्ण कल्पना देण्यात आली होती. तसेच त्यांच्या संमतीने शस्त्रक्रियेद्वारे शौचासाठी त्याला अन्य पर्यायी मार्ग करून देण्यात आला. ही शस्त्रक्रिया करताना “स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिस” केली गेली म्हणजे रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्या क्षणी जे कांही करावे लागते ते सर्व काही केले गेले.
शस्त्रक्रियेप्रसंगी रुग्णाला कर्करोग झाला असून तो संपूर्ण शरीरभर पसरला आहे हे लक्षात आले. तेंव्हा ही बाब देखील रुग्णाच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच पुढील उपचारासाठी रुग्णाला कर्करोग हॉस्पिटलमध्ये दाखल करून केमोथेरपी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
तेंव्हा रुग्णाची परिस्थिती फारशी उत्तम नसल्याने आम्ही त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो असेही रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानुसार रुग्णाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनीही योग्य तेच उपचार केले. आता त्या रुग्णाला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही वस्तुस्थिती असताना आठवड्यानंतर रुग्णाचे नातेवाईक आणि एका संघटनेचे कार्यकर्ते असे 20-30 जणांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची नासधूस करून अर्वाच्य शिवीगाळ करत उद्धट वर्तन केले.
तसेच मी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना रस्त्यावर धक्काबुक्की करून मला मारहाण केली. यामागची मानसिकता अद्याप मला समजलेले नाही परंतु रुग्णाचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे एवढेच लक्षात घेऊन मी सर्वतोपरी प्रयत्न केले, असे डॉ. रोहित जोशी यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस आयएमए बेळगावचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, डॉ. देवगौडा आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1336570310033892/