बेळगावमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून मराठी – कन्नड वाद चिघळला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या रुग्णवाहिकेवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा सोशल मीडियावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, फेसबुकवर आक्षेपार्ह मजकुर अपलोड केल्याचा ठपका ठेवत टिळकवाडी आणि मार्केट पोलिसांनी शुक्रवारी (12 मार्च) दोन फेसबुक अकाऊंटवर स्वत : हून गुन्हे दाखल करुन घेतले आहेत.
टिळकवाडी पोलिसांनी ‘संभाजी गल्ली, बेळगाव’ तर मार्केट पोलिसांनी ‘मराठा गल्ली, बेळगाव’ तर ग्रामीण पोलिसांनी दोन फेसबुक अकाउंट वर गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलीस उपयुक्त विक्रम आमटे यांनी परिपत्रक जारी केले आहे.
शुक्रवारी करवेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस संरक्षणात रामलिंग खिंड गल्ली येथे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर भ्याड हल्ला केला. त्यानंतर सीमाभागात मराठी भाषिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
फेसबुकवर निषेध केल्यामुळे पोलिसांनी मराठी भाषिकांवर गुन्हे दाखल करुन घेण्यास सुरुवात केली आहे. टिळकवाडी व मार्केट पोलिसांनी शुक्रवारी दाखल करुन घेतलेल्या गुन्ह्यात मराठी भाषिकांवर रोख ठेवला असून संभाजी गल्ली व मराठा गल्ली बेळगाव या नावे असलेल्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
बेळगाव महापालिकेसमोर तथाकथित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत आणि बेकायदेशीर असलेला लाल – पिवळा ध्वज उभारल्यापासून सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कन्नड मराठी भाषिक तेढही निर्माण झाला आहे. हा ध्वज हटविण्यात यावा, यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
याविरोधात चार दिवसांपूर्वी मराठी भाषिकांतर्फे निषेध मोर्चा, काढण्यात आला होता. त्यालाही परवानगी नसल्याचे कारण पुढे करत सरदार्स मैदानाजवळ मोर्चा अडविला. त्यानंतर शिवसेनेच्या गाडीवर हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी करवेच्या म्होरक्यावर स्वत : हून गुन्हा दाखल करुन घ्यावा, अशी मागणी केली होती.
परंतु कायदा हाती घेऊन कायद्याची लक्तरे मोडणाऱ्यांवर कारवाई होण्याऐवजी आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढणाऱ्या आणि न्याय मागणाऱ्या मराठी भाषिकांवर कारवाईचा बडगा उगण्यात येत आहे. पोलीस विभागाच्या या कारवाईमुळे मराठी भाषिक जनता नाराजी व्यक्त करत आहे.