अंत्योदय कार्डधारकांना आता रेशनकार्डवर जोंधळ्याचे वितरण करण्यात येणार आहे.
त्यामुळे जोंधळा खरेदी करण्याचे काम सुरू असून यासाठी अतिरिक्त खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
येत्या 1 एप्रिलपासून अंत्योदय कार्डधारकांना जोंधळा वितरित केला जाणार असून त्यासाठी जिल्ह्यात 1 लाख 20 हजार मेट्रिक टन इतका जोंधळा खरेदीचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी संकेश्वर, निपाणी, गोकाक मध्ये खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असून उर्वरित तालुक्यात टीएपीसीएमएस व पीएसीएस सोसायट्यांमधून खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत.
बैलहोंगल तालुक्यात 12, बेळगाव तालुक्यात 4, तालुक्यात 9, सौंदत्ती तालुक्यात 6, रामदुर्ग तालुक्यात 5, गोकाक तालुक्यात 6, अथणी तालुक्यात 8, चिकोडी तालुक्यातील अशी 3 अशी जिल्ह्यात एकूण 53 खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
एका शेतकऱ्याकडून प्रति एकर खरेदीचे किमान उद्दिष्ट 15 क्विंटल इतके ठरविण्यात आले आहे. हायब्रीड व मालदंडी जोंधळा खरेदी करण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.