बेळगाव महापालिकेच्या बेजबाबदार आणि गलथान कारभारामुळे स्वराज्य राजू मोरे या बालकाचा कपिलेश्वर तलावात बळी गेला आहे. तेंव्हा महापालिकेने मोरे कुटुंबाला 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, या प्रमुख मागणीसह अन्य तीन मागण्यांचे निवेदन आज सोमवारी सकाळी म. ए. युवा समितीतर्फे महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली युवा समितीच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन डी सी एम जी हिरेमठ यांना सादर करण्यात आले.
कपिलेश्वर रोड येथील स्वराज राजू मोरे (वय वर्षे 7) हा बालक बेपत्ता आहे अशी बातमी शनिवार दि. 20 मार्च 2021 रोजी आली होती, त्यानंतर रविवार दि. 21 रोजी सदर बालकाचा मृतदेह कपिलतीर्थ तलावात आढळून आला आहे. ही दुर्दैवी घटना महानगरपालिलेच्या दुर्लक्षामुळे आणि गलथान कारभारामुळे घडली आहे. सदर तलावाच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आली नाही हे प्रथमदर्शनी दिसत आहे, या तलावातील पाण्याचा उपसा करणे गरजेचे होते, पण गेली 6 महिने तो उपसा करण्यात आलेला नाही. तलावाची संरक्षण भिंत काहींनी फोडली आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तलावाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप लावण्यात येत नव्हते आणि यामुळेच या परिसरात सर्वांचा मुक्त संचार असतो.
तलावातील पाण्याचा उपसा करण्यात आला असता आणि दोन्ही घटना वेळीच कुलूप लावले असते तर स्वराज्याचा बळी गेलाच नसता. याला सर्वस्वी महानगर पालिकेचे दूर्लक्ष कारणीभूत आहे.
दुर्देवी कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना न्याय मिळावा यासाठी आमच्या पुढील कांही मागण्या आहेत. 1) या दुर्घटनेची चौकशी करून या प्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. 2) सदर तलावाची सुरक्षा वाढवावी. 3) मृत बालकाच्या कुटुंबाला 1 कोटी रुपायांची भरपाई द्यावी. 4) मृत बालकाच्या कुटुंबातील व्यक्तीला महानगर पालिकेत नोकरी देण्यात यावी. सदर निवेदनाचा गांभीर्याने विचार करून नमूद मागण्या मान्य कराल अशी अपेक्षा आहे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह श्रीकांत कदम,संतोष कृष्णाचे, अंकुश केसरकर,सचिन केळवेकर, विशाल आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सदर बालकांच्या कुटुंबियांना मदत करू असे आश्वासन देत योग्य ती कारवाई केली जाईल असेही आश्वस्त केले.