रमेश जारकीहोळींच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या सीडी संदर्भात माजी मंत्री रमेश जारकीहोळींनी रीतसर तक्रार दाखल केली. नोकरीच्या आमिषाला बळी पाडून लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. दरम्यान या साऱ्या गोंधळात जलसंपदा मंत्रिपदाचा जारकीहोळींना राजीनामादेखील द्यावा लागला.
अचानकपणे या सीडी प्रकरणाने ‘यू-टर्न’ घेतला. रमेश जारकीहोळींसंदर्भात षडयंत्र रचण्यात आले असून त्यांना बदनाम करण्यासाठी हा कट रचण्यात आला असल्याची बातमी पसरली. या साऱ्या प्रकारानंतर रमेश जारकीहोळींनी अधिकृतपणे बंगळूर येथील सदाशिवनगर पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली आहे.
रमेश जारकीहोळींनी आपला विश्वासू एम.व्ही. नागराज यांना शनिवारी दुपारी सदाशिवनगर पोलिस ठाण्यात पाठवले आणि त्यानंतर तक्रारीची प्रत पोलिसांना दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हेगारी, कट रचणे, खंडणी आणि बनावटपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर तक्रारीत, जारकीहोळींनी कोणाचे नाव घेतलेले नाही. परंतु ‘काही लोक’ पैसे उकळण्याच्या उद्देशाने आपल्याला बदनाम करण्यात आल्याचा आरोप केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आपल्याविरूद्ध कट रचत असल्याचा दावा त्यांनी केला असून राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी करण्यात आलेला हा कट असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात अनेक लोक गुंतले असून राजकीय पातळीवर अस्थिरता निर्माण करण्यासाठी केलेले षडयंत्र असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.