सीमावाद तसेच भाषेसंबंधीचा वाद भावनात्मकदृष्ट्या नको तर सामंजस्याने मिटवावा, सीमा आणि भाषेचा प्रश्न शांतपणे सोडविला पाहिजे, असा सल्ला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिला.
शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. सीमाभागात मराठी – कन्नड भाषिक गुण्यागोविंदाने राहतात. बेळगावच्या शांततेला तडा जाईल असे प्रकार सध्या होत आहेत. शाई फासणे, दगडफेक करणे यासारख्या कृतीतून काहीच साध्य होत नाही, असे सतीश जारकीहोळी म्हणाले.
सीमाप्रश्न आणि भाषेचा प्रश्न भावनिक नाही तर मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडविणे गरजेचे आहे. वाद झाल्यास आधीपासून सुरु असलेले वाद चिघळून समाजाचे स्वास्थ्य बिघडते. दोन्ही भाषिकांतील बंधुभाव अबाधित राहावा यासाठी प्रयत्न व्हावेत. एकमेकांना समजून घेण्यातच सर्वांचे हित असल्याचे आमदार जारकीहोळी म्हणाले. कन्नड आणि मराठी भाषिक जनता बर्याच वर्षांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर राहत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या भाषिक तेढामुळे केवळ एखाद्याचाच फायदा होऊ शकते असेही ते म्हणाले.
मराठी आणि कन्नड भाषिक जनता शेकडो वर्षांपासून सीमेवर वास्तव्य करीत आहेत. बेळगाव, कोल्हापूर आणि इथेही वेगवेगळ्या भाषांचे लोक प्रेम आणि सद्भावनेने जगत आहेत. म्हणून, या संवेदनशील बाबींकडे भावनिक दृष्टिकोनातून नव्हे तर हा विषय मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडविला पाहिजे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना ओळखण्याची गरज आहे असे सतीश जारकीहोळी म्हणाले.