आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील बुंद फाउंडेशनच्या संचालिका पर्यावरण प्रेमी आरती भंडारी यांनी सोमवारी अनोखा उपक्रम राबविताना शहरातील विविध भाजी मार्केटमधील भाजीविक्रेत्या स्त्री-पुरुषांना स्टीलचे ग्लास दिले आणि चहासाठी याच ग्लासचा उपयोग केला जावा असे सांगून त्यांना मार्गदर्शन केले.
पाणी वाचविणे आणि पर्यावरण अबाधित राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे बुंद फाऊंडेशनच्या संचालिका आरती भंडारे मानतात. शहरात सध्या कचरा गोळा करून तो जाळण्याचा प्रकार सर्रास सर्वत्र पहावयास मिळतो. कचऱ्यातून चहा पिण्यासाठी वापरण्यात आलेले कागदी आणि प्लास्टिकचे ग्लासही जाळले जातात. परंतु प्लास्टिकचे ग्लास पूर्णता नष्ट होत नाहीत. त्यांचे विघटन होत नसल्यामुळे ते पर्यावरणाला घातक असतात. त्यामुळे या ग्लासचा वापर टाळणे आवश्यक आहे.
शहरातील भाजी विक्रेत्यांना चहा याच ग्लासमधून दिला जातो हे लक्षात घेऊन आरती भंडारे यांनी सोमवारी सकाळी शहरातील विविध भाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्या स्त्री-पुरुषांना स्टीलचे ग्लास दिले व चहासाठी यास ग्लासचा उपयोग केला जावा असे सांगून त्यांना मार्गदर्शन केले. यासाठी त्यांनी प्रात्यक्षिकही सादर केले आणि कागदी किंवा प्लास्टिकचे ग्लास आरोग्याला कसे हानिकारक आहेत याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शमा कुलकर्णी उपस्थित होत्या.
त्यांनीदेखील महिलांना स्टील ग्लास वापरण्याचे महत्त्व सांगितले. आम्हाला या प्लास्टिक व कागदी ग्लासचे धोके माहीत नव्हते. मात्र आजपासून आम्ही स्टीलच्या ग्लासामधूनच चहा पिण्यास सुरुवात करू अशी ग्वाही भाजी विक्रेत्या महिलांनी दिली.
संबंधित परिसरात जे चहा विक्रेते आहेत. त्यांनादेखील आरती भंडारे यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगून त्यांनी ग्राहकांसाठी प्लास्टिकचे ग्लास वापरू नये यासाठी त्यांनाही 50 स्टीलचे ग्लास मोफत देऊ केले हे विशेष होय.