लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून काँग्रेस आणि भाजपमध्ये उमेदवाराच्या नावाच्या घोषणेचा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
जितकी उत्सुकता लोकसभा निवडणुकीच्या तारखेची होती त्यापेक्षा अधिक उत्सुकता ही उमेदवारांची नावे जाहीर करण्यासंदर्भात निर्माण झाली आहे. भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असतानाच तिघांची नावे हायकमांडकडे अंतिम निर्णयासाठी प्रलंबित असल्याची माहिती मंत्री आर. अशोक यांनी दिली आहे.
दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही उमेदवारी देण्याची मागणीही होत आहे. तर दुसरीकडे अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. यामुळे बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षासाठी विजयी मतदारसंघ असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. परंतु, केवळ तिघांची नावे हायकमांडला पाठविली असून, उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय हायकमांडच घेईल, असे मंत्री आर. अशोक यांनी सांगितले.
हुबळी येथे ग्रामवास्तव्यासाठी जाण्यासाठी ते बंगळूरहून विमानाने बेळगावात दाखल झाले. अधिकाऱ्यांच्या ग्रामवास्तव्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री अशोक हे देखील ग्रामवास्तव्य करीत असून सांबरा विमानतळावर त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, दिवंगत मंत्री सुरेश अंगडी कुटुंबीयांचा पक्षाशी खुप जवळचा संबंध आहे. हा मुद्दा पक्षाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. आम्ही कार्यकर्त्यांवर जोर दिला आहे. विजयी ठरतील, अशा तीन उमेदवारांची नावे कोअर कमिटीच्या बैठकीत अंतिम करण्यात आली असून ती हायकमांडला पाठविण्यात पाठविण्यात आली आहेत. उमेदवाराबद्दल मी स्वतः अरुणा सिंग यांना माहिती दिली आहे. माझ्या दृष्टीने बेळगाव लोकसभेची उमेदवारी कोणालाही दिली तरी उत्तम आहे. अंतिम निर्णय हायकमांड घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.