वाहनांवरील काळ्या काचा काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. मात्र, या नियमाचे अनेक वाहनधारकांकडून उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे रहदारी पोलिसांनी काळ्या काचा असणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. काळ्या काचा असणाऱ्या वाहनांविरोधातील कायदा अस्तित्वात असताना आता सर्वोच्च न्यायालयाने नवीन काही सूचना केल्याने कारवाईस अधिक वेग आला आहे. शहर वाहतूक शाखेने अशा वाहनांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
मध्यंतरी पोलिस खात्याकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेवाहनांना काळ्या काचा वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. यावरुन याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशी सूचना न्यायालयाने केली आहे. कारच्या काचा पारदर्शक ठेवण्यात याव्यात. त्यावर कोणत्याच प्रकारचे कोटिंग असू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. मात्र याची गंभीर दखल घेण्यात आली नव्हती. याबाबत वाहन धारकांना सुचना देऊन आदेशाचे पालन करण्याची सूचना करण्यातआली होती. मात्र, अनेक वाहनधारकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. राजरोसपणे अनेक वाहनधारक याचा वापर करत आहेत. पोलिस खात्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने रहदारी पोलिस खात्याकडून कारवाईला गती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस खात्याला याची तातडीने दखल घेणे भाग पडले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. याबरोबरच वाहनांच्या काचा काळ्या असल्यास संबंधित वाहन चालकांवर 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
‘काळी फिल्म’ बसविण्यात आलेल्या वाहनधारकांविरोधात आतापर्यंत कारवाई करताना पोलिसांना कायद्यातील पळवाटांचा अडथळा येत होता. त्यामुळे कारवाईचे हे प्रमाण अत्यल्पच होते. शहरातील अनेक वाहनधारकांकडून काचांवर वेगवेगळ्या प्रकारच्या काळी फिल्म बसविण्यात आली आहे. या वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक शाखेकडून वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.