धर्मादाय विभागाने बेळगावमधील अनेक देवस्थानांवर प्रशासक नेमण्यासंदर्भात जारी केलेल्या आदेशाला विरोध करत श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने आज बेळगावमध्ये निदर्शने करण्यात आली.
बेळगाव जिल्ह्यातील 16 विविध देवस्थानांमध्ये प्रशासक नेमण्यासंदर्भात राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचा निषेध करत श्रीरामसेना हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करत, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. हिंदुत्वासाठी आम्ही या सरकारला निवडून दिले असून, केवळ हिंदू मंदिरांनाच लक्ष्य करण्यात येत आहे. इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या बाबत असे निर्णय का घेण्यात येत नाहीत? सरकारला केवळ हिंदू धर्मियांचीच देवस्थाने दिसत आहेत का? असा जाब विचारात जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जोरदार घोषणाबाजी केली.
बेळगाव जिल्ह्यातील 16 मंदिरांसह विविध मंदिरांमध्ये प्रशासक नेमण्याचा राज्य सरकारचा आदेश हा हिंदूंवर जुलूम करण्यासारखा आदेश आहे. या आदेशाला सर्व हिंदू धर्मियांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
सरकारकडून पैशाची मागणी न करता मंदिरे चालवली जात आहेत, हे सरकारला सहन होत नाही का? हिंदू धर्मियांच्या देवस्थानासंबंधी जारी करण्यात आलेला आदेश सरकारने त्वरित मागे घ्यावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रीरामसेन हिंदुस्थानचे बेळगाव जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी दिला.
कपिलेश्वर मंदिरासह 18 मंदिरांवर प्रशासक नेमण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. आणखी 214 मंदिरांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय म्हणजे हिंदू धर्मियांवरील अन्याय आहे.
हे नियम आणि आदेश केवळ हिंदू धर्मियांवरच का? असा सवाल शहर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांनी केला. या आंदोलनात ऍड. अमर येळ्ळूरकर , महादेव पाटील यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते .