विघ्नसंतोषी करवे कार्यकर्ते शहरात पुन्हा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याची माहिती मिळाल्याने आज बुधवारी शहरातील शिवसेना कार्यालय परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. त्याच प्रमाणे शिवसैनिक देखील करवे कार्यकर्त्यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाले होते.
शिवसेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारगाडीवरील फलकाची करवे कार्यकर्त्यांकडून मोडतोड करण्याचा प्रकार अलीकडेच घडल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज बुधवारी शहरातील कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे करवे कार्यकर्ते पुन्हा जमा होऊ लागले आहेत अशी माहिती मिळताच रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालय परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.
खबरदारीचा उपाय म्हणून रामलिंग खिंड गल्ली रस्ता बॅरिकेड्स टाकून अडविण्यात आला होता. शिवसेना कार्यालयासमोर पोलिसांची एक बस तैनात करण्याबरोबरच या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.
दरम्यान, करवे कार्यकर्त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आज शिवसैनिक देखील बाह्या सरसावून सज्ज झाले होते. करवेच्या कन्नड गुंडांनी आज जर पुन्हा आगळी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सोडायचे नाही असा चंगच प्रत्येक शिवसैनिकाने बांधला होता. याप्रसंगी शिवसेनेच्या कार्यालयाच्या ठिकाणी जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, समन्वयक अरविंद नागनुरी, संघटक दत्ता जाधव, राजकुमार बोकडे, दिलीप बैलुरकर, बंडू केरवाडकर, संजय गोरले, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजू तुडयेकर आदींसह बरेच शिवसैनिक उपस्थित होते.
करवे कार्यकर्त्यांनी शांतता भंग करून नासधूस करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चांगलाच धडा शिकविण्याचा निर्धार या सर्वांनी केला होता. मात्र करवे कार्यकर्त्यांना पोलिसांनी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथेच अडवून ताब्यात घेतल्याचे समजते.