बेळगाव महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या यमनापूर येथील नायक समाजाने आपल्या जागेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. येथील जागा सरकार कब्जात घेण्याच्या विचारात आहे.
याविरोधात आवाज उठविणाऱ्या नायक समाजाने ‘रक्त गेले बेहत्तर, पण आमची एक इंचही जागा देणार नाही’ असा पवित्र घेत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. आणि या जागेसंदर्भात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ याना निवेदन देखील सादर केले.
या समाजाची एकूण ८ एकर ३३ गुंठे जमीन आहे. त्यातील चार आरटीओ तर तीन कामगार खाते आणि एक एकर जागा ही २४ तास पाणी योजनेसाठी प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.
या जागेव्यतिरिक्त या समाजाकडे दुसरी जागा नाही. या समाजातील लोक हे आर्थिक दुर्बल आहेत. या जागेवर आमची मालकी असून ही जागा प्रशासन बळकावू पाहत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ते पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी महापौर बसाप्पा चिकलदिनी, सिद्धाराज चन्नहोसुर, पी. एम. नाईक, बी. बी. गस्ती, एस. एस. गस्ती, रामाप्पा गस्ती आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.