मारुती गल्लीतील प्रतिष्ठित डॉ. रोहित जोशी यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसून एका जमावाने डॉक्टरांवर हल्ला करण्याबरोबरच हॉस्पिटलमधील साहित्याची तोडफोड केली या घटनेचा बेळगाव आयएमए तीव्र निषेध करत आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर आणि रुग्णाच्या हिताच्या दृष्टीने भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी संबंधित हल्लेखोरांना कायद्यानुसार कडक शिक्षा केली जावी आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता ओपीडी बंद ठेवण्याचा आमचा संप सुरूच राहील, अशी माहिती आयएमए बेळगावचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी दिली.
एका तरुणावरील शस्त्रक्रियेच्या मुद्द्यावरून दुर्लक्षपणाचा आरोप करीत रुग्णाचे नातेवाईक व संतप्त नागरिकांनी हॉस्पिटलची तोडफोड आणि डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याची घटना काल सोमवारी दुपारी मारुती गल्ली येथे घडली. यासंदर्भात माहिती देऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयएमए बेळगावतर्फे आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष डॉ. अनिल पाटील बोलत होते. कोणतीही बाजू समजून न घेता डॉक्टरांना मारहाण करणे, हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड करणे अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. डॉक्टरांच्या बाबतीतील या हिंसाचाराच्या वाढत्या घटनांमुळे आमचे मनोबल खचत चालले आहे. त्यामुळे डॉक्टरांना प्रचंड त्रास आणि तणावाखाली राहावे लागत आहे. यासाठी काल मारुती गल्ली येथे एका जमावाने शहरातील प्रतिष्ठीत डॉ. रोहित जोशी यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड करण्याबरोबरच डॉक्टरांना मारहाण केली या घटनेचा आयएमए तीव्र निषेध करत आहे. आयएमए कर्नाटक राज्य अध्यक्ष डॉ. व्यंकटचलय्या यांनी देखील या प्रकाराचा निषेध केला आहे, असे डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले.
मारुती गल्ली येथील डॉ. रोहित जोशी यांच्या हॉस्पिटलमध्ये घडलेला हिंसाचाराचा प्रकार हा वैयक्तिक स्वार्थासाठी केलेला होता. कारण रुग्णांच्या बाबतीत कांहीही चुकीचे झालेले नाही. ज्या लोकांनी डॉ. रोहित जोशी यांच्यावर हल्ला करून जे नुकसान केले आहे ते फक्त डॉ. जोशी यांचे झालेले नसून वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांचे झाले आहे. कारण कालच्या प्रकारामुळे फक्त जनतेमध्येच नाही तर डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. चुकीचे उपचार झाले तर काय करायचे? या विचाराने जनतेमध्ये डॉक्टरांबद्दल भीती निर्माण होईल. त्याचप्रमाणे बरं वाईट काय झालं तर काय करायचं? या भीतीपोटी डॉक्टर देखील अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णांवर उपचार करायला कचरतील, असेही डॉ. अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
काल एका विशिष्ट संघटनेकडून केला गेलेला हिंसाचाराचा प्रकार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणारा ठरू शकतो. कारण उद्या संबंधित लोक उपचारासाठी डॉक्टरांना धमकावण्यात देखील मागेपुढे पाहणार नाहीत, ही सर्वात मोठी भीती आहे. यासाठी कालच्या कृत्याबद्दल आम्ही संबंधित संघटनेचा तीव्र निषेध करतो. आतापर्यंत राज्य व केंद्र सरकारने आमच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. परंतु डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रकार थांबलेले नाहीत. आम्ही वेळोवेळी केलेल्या मागणी वरून सरकारने डॉक्टर आणि जनतेमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत समस्या निकालात काढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ही समस्या वाढत चालली आहे, असे प्रकार भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी कालच्या प्रकारांमध्ये जे लोक सहभागी होते त्या सर्वांवर तात्काळ एफआयआर नोंदवून त्यांना कायद्यानुसार कडक शिक्षा दिली जावी आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही. तोपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता ओपीडी बंद ठेवण्याचा आमचा संप सुरूच राहील, असेही डॉ अनिल पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले.
तसेच पत्रकार परिषदेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले जाणार आहे आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. पत्रकार परिषदेस डॉ. रोहित जोशी, डॉ. देवगौडा आदींसह आयएमएचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1336571330033790/