आपल्या देशावर कंपन्या राज्य करू पाहत आहेत. इथे कोणत्याही पक्षाचे सरकार नाही. तसे असते तर ते शेतकऱ्यांशी चर्चेला तयार झाले असते. हे तर कंपनीचे सरकार आहे. लुटारूंचे सरकार आहे. मात्र आता जो आहे तो लुटारूंचा शेवटचा बादशहा असणार आहे. यासाठी सत्तेमध्ये असणाऱ्या या लुटारूंना पळून लावले पाहिजे, असे परखड मत राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रमुख नेते राकेश टिकैत त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय किसान मोर्चा कर्नाटक राज्य रयत संघ आणि विविध शेतकरी संघटनांतर्फे बेळगावातील सीपीएड कॉलेज मैदानावर आज दुपारी आयोजित शेतकऱ्यांच्या महापंचायत अर्थात महासभेप्रसंगी प्रमुख वक्ते या नात्याने टिकैत बोलत होते. आपल्या परखड भाषणामध्ये राकेश टिकैत म्हणाले की, केंद्र सरकारने लागू केलेले तीन अन्यायी कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन करते शेतकरी घरी परत जाणार नाहीत. आम्ही सरकारला 8 महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यानंतर पुढचे पाऊल उचलले जाईल. अन्यायी कृषी कायद्यांच्या विरोधात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ आदी दक्षिणेतील राज्यामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना देखील रस्त्यावर उतरावे लागेल.
बेळगाव ही आंदोलनाची भूमी आहे. येथून अनेक आंदोलने सुरू झाली आहेत. राणी चन्नम्मांनी येथूनच इंग्रजांविरुद्ध आंदोलन केले. तेंव्हा तुम्हाला देखील येथून आंदोलन उभे करावे लागेल असे सांगून तुम्ही सौभाग्यशाली आहात की तुम्हाला बेंगलोरला जावे लागणार नाही. तुमच्यासाठी विधानसभा बेळगावलाच आहे. या विधानसभेला घेराव घाला. तुमची कृषी उत्पादने तुम्हीच विका असे, आवाहन टिकैत त्यांनी केले.
दक्षिण भारतातील नेते आणि अधिकाऱ्यांनी येथील शेतकरी संघटनांची अवस्था वाईट केली आहे. आता बैठका, सभा घेण्यासाठी प्रशासन वगैरेंची परवानगी घेण्याची गरज नाही. परवानगी मागायला जाल तर आजच्या पंचायती सारखी स्थिती होते. अधिकारी तुम्हाला मंडप देखील घालू देणार नाही. आम्ही गेल्या 35 वर्षात सरकार अथवा प्रशासनाकडून एकदाही सभा मेळाव्यासाठी परवानगी घेतलेली नाही. असे स्पष्ट करून न्यायहक्कासाठी तुम्ही पंचायत घ्या, तीव्र आंदोलन छेडा, तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर त्याचे पडसाद दिल्लीमध्ये उमटेल हे लक्षात ठेवा. तुम्ही एकदा का पोलिसांनी घातलेली बॅरिकेड्स ट्रॅक्टरने तोडली की तुमचे आंदोलन यशस्वी झाले म्हणून समजा. ट्रॅक्टर घेऊन तुम्हाला आंदोलन करावे लागेल. कारण ट्रॅक्टर हे एखाद्या रणगाड्या प्रमाणे आहे हे लक्षात ठेवा, असे टिकैत यांनी सांगितले.
2021 हे वर्ष आंदोलनाचे वर्ष आहे शेतकऱ्यांची लढाई सुरू झाली आहे. आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत शांततेने लढा कसा द्यायचा ते आम्हाला चांगले माहीत आहे, जर कोणी कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कसा धडा शिकवायचा हे देखील आम्हाला माहित आहे. घाबरण्याचे कांहीही कारण नाही. शेतकरी विरोधी तीन अन्यायी कृषी कायदे अस्तित्वात येण्यापूर्वी देशात प्रथम गोदाम उभारण्यात आली. धान्याचा साठा करण्याची व्यवस्था केली गेली. या गोदामांमध्ये लाखो टन धान्याचा साठा केला जाऊ शकतो. याचा अर्थ गरीबांची भाकरी कंपनीच्या तिजोरीत बंद होणार आहे आणि त्यानंतर ती कंपनी कोणाला किती भूक लागली ते पाहून त्यानुसार भाकरीची किंमत ठरविणार आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. या पद्धतीने शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सध्या देशात अनेक लोक बंधनात आहेत. प्रसारमाध्यमांवर देखील बंदुकीचा पहारा आहे. पुढील कायदा जो असेल तो त्यांच्या विरुद्ध असणार आहे हे लक्षात ठेवा. अद्याप तो कायदा आलेला नाही. जेंव्हा तो कायदा येईल तेव्हा प्रसारमाध्यमांची प्रत्येक बातमी प्रथम सेन्सॉर बोर्डाकडे जाईल आणि त्यानंतरच प्रसिद्ध होईल.
आपल्या देशावर कंपन्या राज्य करू पाहत आहेत. इथे कोणत्याही पक्षाचे सरकार नाही तसे असते तर ते शेतकऱ्यांशी चर्चेला तयार झाले असते. हे तर कंपनीचे सरकार आहे. लुटारूंचे सरकार आहे मात्र आता जो आहे तो लुटारूंचा शेवटचा बादशहा असणार आहे. यासाठी सत्तेमध्ये असणाऱ्या या लुटारूंना पळून लावले पाहिजे. त्यांच्याविरुद्ध लढाईला सुरुवात झाली आहे. जोपर्यंत भारत सरकार कायदे मागे घेण्याची कायदेशीर हमी देत नाही आणि जे कायदे येणार आहेत त्यांना रोखण्यात येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील. कारण हे फक्त तीन कायदे नाही तर त्यांचे आणखी उप कायदे येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दीर्घ लढा द्यावा लागणार आहे. तेंव्हा तयार व्हा, उठा, चला आणि लढा. आपल्याला 8 महिने ही लढाई लढावी लागणार आहे असे राकेश टिकैत म्हणाले.
‘एक ट्रॅक्टर, एक गाव, 15 लोक आणि 10 दिवस’ हे लढाईचे सूत्र आहे. पहिली तुकडी झाली की दुसरी तुकडी या पद्धतीने आंदोलन केल्यास ते कधीच अयशस्वी होणार नाही. जिल्हावार बैठका घ्या, संघटना मजबूत करा, गावागावांमध्ये कमिट्या नेमा, प्रसारमाध्यमांची संपर्कात राहा, सोशल मीडियावर प्रचार करा. हे काम तुम्हाला करावे लागेल अन्यथा तुमच्या जमिनी जातील. कंपन्या येत आहेत या तुमच्या जमिनी कंत्राटी पद्धतीने घेतील, हे लक्षात ठेवा. यापुढे सभा मेळाव्याला परवानगी न मागण्याची सवय लावून घ्या. आंदोलन करताना बॅरिकेड्स तोडावे लागतील. तुमचे ट्रॅक्टर हेच तुमचे रणगाडे आहेत. त्यांचा वापर करायला शिका. झाडे लावा, पर्यावरणाचे संरक्षण करा असे सांगून महिलांनी देखील शेतकरी आंदोलनांमध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी शेवटी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय किसान मोर्चाचे तसेच कर्नाटक राज्य रयत संघ आणि विविध शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. आजच्या या शेतकरी महापंचायत अर्थात महासभेला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.