सर्व कांही नियोजित योजनेप्रमाणे झाले तर सिटी सॅनिटायझेशन प्लॅन (सीएसपी) च्या शिफारसीनुसार बेळगाव शहरात महिलांसाठी समर्पित अशी आधुनिक 20 पिंक टॉयलेट्स उभारण्याची बेळगाव महापालिकेची योजना आहे.
पुढील 25 वर्षात शहरे कशी स्वच्छ ठेवता येतील? या दृष्टिकोनातून कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील? कोणत्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावे लागतील? या अनुषंगाने सरकारी मान्यताप्राप्त एका एजन्सीने एक सर्वेक्षण हाती घेतले आहे.
या सर्वेक्षणाअंतर्गत सर्वसामान्यांची मते आजमावण्यात येत आहेत. या एजन्सीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जर सर्व कांही व्यवस्थित झाले तर सिटी सॅनिटायझेशन प्लॅन (सीएसपी) च्या शिफारसीनुसार बेळगाव शहरात महिलांसाठी समर्पित 20 पिंक टॉयलेट्स म्हणजे गुलाबी स्वच्छतागृहे भरली जाणार आहेत. सिटी सॅनिटायझेशन प्लॅन या योजनेची तयारी करण्यासंदर्भात मागील जानेवारी महिन्यामध्ये संबंधित अधिकारी आणि योजनेतील भागधारकांची बैठक झाली आहे.
सदर योजना मागील वर्षी मार्च महिन्यातच प्रत्यक्षात साकारणार होती. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली. तथापि आता संबंधित एजन्सीने शहरांमधील स्वच्छते संदर्भातील आपले सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणाअंती सर्वसामान्यांसह विशेष करून महिलांची सार्वजनिक स्वच्छता गृहाअभावी होणारी गैरसोय आणि कुचंबणा लक्षात घेऊन बेळगाव शहरात महिलांसाठी समर्पित आधुनिक 20 पिंक टॉयलेट्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांप्रमाणेच बेळगावात पुरुषांसाठी देखील ब्ल्यू टॉयलेट्सची उभारणी केली जाणार आहे. सीएसपी योजनेअंतर्गत संपूर्ण बेळगाव शहरात नव्याने भुयारी गटार अर्थात ड्रेनेज बांधकाम सुचित करण्यात आले आहे. याखेरीज घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे. सार्वजनिक ठिकाणचा कचरा एकत्रित करणे आदी शहर स्वच्छतेसंदर्भातील उपाययोजनाचा सीएसपी योजनेत अंतर्भाव आहे.
दरम्यान, सर्वेक्षणाअंती संबंधित एजन्सीने पुढील 25 वर्षसाठी रस्त्यांचा नकाशाच्या मदतीने शहर स्वच्छते संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले आहेत आणि ज्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये शहर स्वच्छते संदर्भातील या प्रकल्पाचा अंतिम प्रस्ताव तयार करण्यापूर्वी आम्ही आमच्या कल्पना समाविष्ट करू, त्यानंतर सदर प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठविला जाईल, अशी माहिती बेळगाव महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली आहे.