बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अंतिम करण्यावर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये चुरस सुरु झाली असून सार्वराथम कोणत्या पक्षाचा उमेदवार जाहीर होईल याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. राजकीय रणनीती अत्यंत शिगेला पोहोचली असून सर्वांची नजर आता उमेदवार जाहीर होण्याकडे लागली आहे. दोन्ही पक्षांमध्ये उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असून बंगळूर मध्ये दोन्ही पक्षांच्या जोरदार बैठका सुरु आहेत. रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता राजकीय सूत्रांनी वर्तविली आहे.
शनिवारी दिवसभर बंगळूर मध्ये काँग्रेस कार्यालयात अनेक बैठका पार पडल्या. बेळगाव जिल्ह्यातील नेत्यांशी प्रदीघ चर्चा करण्यात आली असून सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे. सतीश जारकीहोळी यांनी निवडणूक लढवावी अशी वरिष्ठ नेत्यांची मर्जी असून जारकीहोळींकडे तशी मागणी आणि आग्रह करण्यात आला आहे.
तर भाजपमध्ये अनेक इच्छुक निवडणूक लढविण्यास तयार असून नेमके कोणाचे नाव जाहीर करावे आणि कोणता उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून विजयी करावा, याबाबत भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. असंख्य इच्छुक उमेदवारांच्या यादीतून महांतेश कवटगीमठ, डॉ. रवी पाटील, डॉ. सोनवलकर आणि सुरेश अंगडी यांची कन्या श्रद्धा शेट्टर यांची नावे टॉप लिस्टवर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शनिवारी बेळगाव येथील सांबरा विमानतळावर दाखल झालेल्या आर. अशोक यांनी बेळगावमध्ये निवडणूक लढविण्यासाठी अंतिम चार जणांच्या नावांची हायकमांडकडे शिफारस करण्यात आल्याची माहिती दिली असून रविवारी रात्री उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती दिली. तसेच भाजपतर्फे प्रामाणिक कार्यकर्त्याच्या नावाचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सध्या बेळगावमध्ये उमेदवार जाहीर होण्याचा मुद्दा चांगलाच गाजत असून इतर पक्षांपेक्षा काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. १७ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आणि त्यानंतर होणाऱ्या मतमोजणीसाठी जितकी उत्सुकता आहे तितकीच उत्सुकता उमेदवारांची नावे जाहीर होण्याबद्दल आहे.