बेळगावमध्ये लोकसभा पोटनिवडणूक उमेदवाराच्या घोषणेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलेच राजकारण सुरु आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवारांची यादी तशी मोठी आहे. परंतु काँग्रेसमध्ये सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांची नावे सर्वात वरच्या स्थानावर आहेत त्या नंतर आनंद स्वामी गडदेवरमठ यांचे नाव आहे.
बंगळूर आणि दिल्लीमध्ये अनेक इच्छुक उमेदवार ठाण मांडून बसले आहेत. एकामागून एक बैठकादेखील होत आहेत. सध्या काँग्रेसमधून सतीश जारकीहोळींना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून मिळाले आहे. तर सतीश जारकीहोळींना उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून माजी खासदार रमेश कत्ती यांना भाजपमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी(जारकीहोळी कुटुंब) आणि रमेश कत्ती(कत्ती कुटुंबीय) यांचे खूप जवळचे संबंध आहेत. सलोख्याने राहणाऱ्या या दोन्ही घराण्यात राजकारण्यां मध्ये तगडी टक्कर घडवून आणण्याचे राजकारण सुरु होईल का यावर चर्चा सुरू आहे. गेल्या काही वर्षात रमेश कत्ती आणि सतीश जारकीहोळी या दोन्ही कुटुंबांनी बेळगावच्या राजकारणात एकमेकाला पूरक असे राजकारण केले आहे नुकताच झालेल्या डी सी सी बँकेत कत्ती आणि जारकीहोळी यांनी समझोत्याचे राजकारण केले होते परंतु पोट निवडणुकीत दोघांनाही निवडणूक रिंगणात उतरवण्याची रणनीती राजकीय पक्षांमध्ये सुरु आहे. यासोबतच दुसऱ्या बाजूला सतीश जारकीहोळी यांच्या ऐवजी दुसरा चेहरा काँग्रेस पुढे आणत असेल तर रमेश कत्ती यांच्या जागी श्रद्धा शेट्टर यांना उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
बेळगावमधील एकंदर निवडणुकीचे वातावरण पाहता साऱ्या जनतेचे लक्ष अधिकृत उमेदवार घोषणेकडे खिळून आहे. परंतु दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार घोषणेचे अस्त्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. एकमेकांच्या निवडणूक रणनीतीवर दोन्ही राष्ट्रीय पक्ष बारीक नजर ठेवून आहेत.
काँग्रेसमध्ये निश्चित उमेदवार आहेत. परंतु भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे अद्यापही अंतिम निर्णयापर्यंत भाजप पोहोचलेला नाही. शुक्रवार किंवा शनिवारी शहास काटशह अशा पद्धतीने अधिकृत उमेदवारांची नावे घोषित होण्याची शक्यता आहे.