केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्यावतीने बेळगाव येथे येत्या 31 मार्च 2021 रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देऊन राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
कर्नाटक राज्य रयत संघटनेच्यावतीने 31 मार्च रोजी बेळगाव येथील सीपीएड कॉलेज शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यास राष्ट्रीय नेते राकेश टिकैत हे या प्रसंगी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, राज्य रयत संघटना अध्यक्ष चनप्पा पुजारी, चुकी अक्का, नागेंद्र स्वामी, रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष राघवेंद्र नाईक, महिला अध्यक्ष जयश्री गुरण्णावर, बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे, चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार, कार्याध्यक्ष राजू मेटी आदी सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राज्य रयत संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे. तरी समस्त शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने सार्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत बेळगावात उपस्थित राहणार आहेत.
केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही हे आंदोलन दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत बेळगावच्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.