कोरोना प्रादुर्भावाचा वाढता धोका लक्षात घेऊन आगामी गुढी पाडवा (उगादी), होळी, शब् -ए -बरात, गुड फ्रायडे आदी सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक सरकारचे मुख्य सचिव पी. रविकुमार यांनी आज गुरुवार दि. 25 मार्च रोजी हा बंदी आदेश जारी केला आहे.
राज्य सरकार आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसडीएमए) राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत वेळोवेळी विविध आदेश आणि सूचना देत आले आहे. मात्र आता कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचे निदर्शनास आले आहे.
गुढीपाडवा (उगादी), होळी, शब् -ए -बरात, गुड फ्रायडे आदी सार्वजनिकरीत्या साजरे केले जाणारे आगामी सण कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होण्यास कारणीभूत ठरू शकतात. ज्यामुळे राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये पीछेहाट होऊ शकते. यासाठी आगामी सणांच्या कालावधीत राज्यातील सार्वजनिक ठिकाणी, मैदानांवर, उद्यानांमध्ये, धार्मिक जागी गर्दी करून अथवा मेळावे -सभा घेऊन सण साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश एसडीएमए राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष या नात्याने पी. रवीकुमार यांनी राज्यातील सर्व आयुक्त, बीबीएमपी, जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 नुसार तसेच भादंवि कलम 188 आणि कर्नाटक संसर्गजन्य रोग कायदा 2020 च्या कलम 4, 5 आणि 10 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा आदेशाद्वारे देण्यात आला आहे.