लोकसभा पोटनिवडणुकीच्या इलेक्ट्रॉनिक मशीनसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नव्या एपीएमसी भाजी मार्केटमधील खरेदी-विक्री व्यवहार अचानक अन्यत्र हलविल्यामुळे एकच गोंधळ उडवून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसल्याची घटना आज सकाळी घडली. एपीएमसीच्या गलथान कारभारामुळेच हा प्रकार घडल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मशिनी आज अचानक नव्या एपीएमसी भाजी मार्केटमधील ‘सी’ विभागाच्या अंडरग्राउंड पार्किंगच्या जागेत ठेवण्यात आल्या असून त्याठिकाणी त्यांची पाहणी आणि किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ही कार्यवाही करताना एपीएमसी भाजी मार्केट ए, बी आणि सी गाळ्यांची लाईन तडकाफडकी तेथील कांदा मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या संडे मार्केटच्या खुल्या जागेत हलविण्यात आली आहे. काल गुरुवारी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना सांगून ही कार्यवाही करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांना याचा पत्ता नव्हता. परिणामी आज सकाळी नेहमीच्या जागी भाजी मार्केटचे व्यवहार होत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांचा एकच गोंधळ उडाला.
कांदा मार्केटच्या मागील बाजूस असणाऱ्या संडे मार्केटच्या खुल्या जागेत भाजी मार्केट हलविण्यात आल्यामुळे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कोणाचा कोणाशी व्यवहार होतोय? कोणाकडून कोणाच्या मालाची उचल होते? आदी बाबतीमध्ये सावळा गोंधळ निर्माण झाल्यामुळे याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र आज सकाळी पहावयास मिळाले. निवडणुकीच्या इलेक्ट्रॉनिक मशीन रविवार पर्यंत त्या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी उद्यापासून सोमवारपर्यंत या ठिकाणी आपली कृषी उत्पादने न आणण्याचा निर्णय घेतला आहे. कारण सध्या अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे खुल्या जागेत शेतीचा माल ठेवल्यास आणखीन नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक लक्षात घेऊन निवडणुकीच्या इलेक्ट्रॉनिक मशीन ठेवण्यासाठी जागा लागणार हे सरकारने बेळगाव एपीएमसी प्रशासनाला महिन्याभरापूर्वीच कळविले होते असे सांगण्यात आले. मात्र एपीएमसीने याची कल्पना त्यावेळीच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिली नाही. काल सकाळी एपीएमसीच्या अधिकाऱ्यांनी अचानक भाजी मार्केटमध्ये भेट दिली. तसेच तेथील व्यापाऱ्यांना उद्यापासून भाजी मार्केटमधील ए आणि बी लाईन अर्धी सुरू ठेवून सी लाईन पूर्णपणे बंद करून अन्यत्र हलविण्यात येत असल्याची माहिती दिली होती.
मात्र प्रत्यक्षात काल रात्री पोलीस बंदोबस्तामध्ये संपूर्ण भाजी मार्केट सील करण्यात आले. कोणालाही आत सोडले जात नव्हते. त्यामुळे व्यापार्यांनी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत आपापल्या गाळ्यांमधील आवश्यक कागदपत्रे आणि साहित्य जमा करून आपल्या ताब्यात घेतले. एपीएमसीच्या गलथान कारभारामुळे व्यापाऱ्यांना मनस्ताप आणि आज शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.