8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत ‘बेळगाव लाईव्ह’ने विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध केली. बेळगाव मधील तळागाळातील आणि अनेक माध्यमातील महिलांची प्रेरणादायी यशोगाथा खास बेळगाव लाइव्हच्या वाचकांसाठी…
प्रचंड आत्मविश्वास, जबरदस्त जिद्द, कुठलंही यश संपादन करण्यासाठी आवश्यक ते कष्ट घेण्याची तयारी आणि उपजत कलागुणांना फुलविण्यासाठी लागणारी मनोवृत्ती हे यशाचे गमक आहे. या साऱ्या गोष्टीची सांगड घालत बेळगावच्या निशिगंधा कानूरकर हिने कलाक्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षांपासून भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचे धडे गिरविणाऱ्या निशिगंधाने विदुषीपर्यन्तचे शिक्षण घेऊन नृत्य क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. केवळ नृत्य क्षेत्रच नाही तर अभिनय, नृत्यदिग्दर्शन, योगा प्रशिक्षक, न्यूट्रिशनिस्ट, कन्टेन्ट रायटर अशा विविध गोष्टींचाही अभ्यास करून त्या क्षेत्रात यश संपादन केले आहे. आपल्या अष्टपैलू कलेच्या माध्यमातून तिने आजवर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
एमसीए पर्यंत शिक्षण घेतलेल्या निशिगंधाने शास्त्रीय नृत्याचे धडे रेखा हेगडे यांच्याकडून घेतले आहेत. सतत २० वर्षे प्रचंड मेहनत आणि प्रयत्नांच्या जोरावर भारतनाट्यममध्ये अलंकार आणि विद्वत अशा पदव्या कर्नाटक आणि महाराष्ट्र परीक्षा मंडळाकडून संपादित केल्या आहेत. याचप्रमाणे कथक या नृत्यप्रकाराचेदेखील प्रशिक्षण घेत आहे. आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन आजतागायत तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. विविध राज्यांमध्ये झालेल्या अनेक स्पर्धांमधून तसेच दूरदर्शनवर झालेल्या कार्यक्रमात यशस्वी सहभाग घेत आपला ठसा उमटविला आहे. उत्कृष्ट सादरीकरण आणि विविध संकल्पनेमुळे प्रेक्षकांची माने जिंकण्यात यशस्वी ठरलेली निशिगंधा कानूरकर कर्नाटक संगीत नृत्य अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
केवळ नृत्यच नाही तर अभिनय क्षेत्रातदेखील निशिगंधाने आपले नाव कोरले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश घेत प्रथमेश परब, सिद्धार्थ मेनन, अरुण कदम, पॅडी कांबळे, संदीप गायकवाड, प्रदीप पटवर्धन, सचिन देशपांडे, मेघा भागवत, कांचन पगारे आणि श्री. युनिव्हर्स – संग्राम चौगुले यांच्यासोबत सहकलाकार म्हणून तिने काम केले आहे. लघुपट, म्युझिक व्हिडीओ, कन्नड मालिका, विविध जाहिरातींमध्येही तिने काम केले आहे. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या संगीत व्हिडिओमध्ये तसेच कन्नड भाषेतील उदय वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या नव्या मालिकेत आणि वयाच्या अवघ्या २६ व्य वर्षी अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
तिच्या कला आणि नृत्य क्षेत्रातील कामगिरीबद्द्ल युवा प्रतिबहोत्सव २०११, नॅशनल दूरदर्शन चॅनल, सवर्ण नाट्य मयुरी (हुबळी), कला संजीवनी (बंगलोर), गंगुबाई हंगल यांच्या उपस्थितीत कला कनमनी (धारवाड), नाट्य संमोहिनी (म्हैसूर), नाट्य ध्रुव (हुबळी) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पुणे फॅशन सिरीज, कन्नड चित्रपट ‘चितायू’, मराठी चित्रपट ‘भारतीय’, बंगलोर फेस्टिव्हल, बेळगाव क्रेडाई फेस्टिव्हल, पुणे गुढी पाडवा फेस्टिव्हल, बेळगाव नाट्यसंमेलन, बेळगाव सांस्कृतिक संमेलन अशा विविध ठिकाणी नृत्य प्रशिक्षक म्हणून सेवा बजाविली आहे.
तंजावर, तामिळनाडू, हुबळी, धारवाड, कारवार, गोवा, कोलकाता, मुंबई, हैद्राबाद अशा अनेक ठिकाणी झालेल्या विविध कार्यक्रमामध्ये तिने आपली कला सादर केली आहे. सध्या ‘असीम ऊर्जा’ नावाची संस्था ती चालवत असून या माध्यमातून २०० हुन अधिक प्रशिक्षणार्थींना ती नृत्य, योगा आणि कलेचे प्रशिक्षण देत आहे. अत्यंत कमी वयात मिळविलेल्या या यशाबद्दल ‘बेळगाव लाईव्ह’ कडून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
-वसुधा कानूरकर -सांबरेकर