अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) अर्थात भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याने राज्यभरात सर्वात मोठे धाडसत्र हाती घेतली असून बेळगावच्या एका अधिकाऱ्यासह 9 अधिकाऱ्यांशी निगडीत 28 ठिकाणी तपास मोहीम हाती घेण्यात आली आहे. बेळगाव सर्कलचे उपमुख्य इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर हणमंत शिवाप्पा चिकन्नावर यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकून एसीबीच्या पथकाने तपास कार्य हाती घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण 9 अधिकाऱ्यांविरुद्ध 11 जिल्ह्यांमधील 28 ठिकाणी धाड टाकून तपास कार्य हाती घेण्यात आले आहे. एसीबीचे 52 अधिकारी आणि 174 कर्मचारी संबंधित विभागीय जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नेतृत्त्वाखाली सदर धाडसत्र आणि तपास मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत.
बेळगाव सर्कलचे उपमुख्य इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर हणमंत शिवाप्पा चिकन्नावर यांचा चन्नम्मानगर अनगोळ येथील फ्लॅट, जमखंडी तालुक्यातील गोलमभावी या त्यांच्या मूळगावी असलेले त्यांचे घर आणि शांतिनाथ हॉम्स अपार्टमेंट कित्तूर राणी चन्नम्मानगर बेळगाव येथे असलेला आणखीन एक फ्लॅट या ठिकाणी धाड टाकून तपास कार्य हाती घेण्यात आले आहे. उत्तर विभागाचे जिल्हा पोलीस प्रमुख नेमगौडा (केएसपीएस) यांच्या नेतृत्वाखाली चिकन्नावर यांच्या फ्लॅट व कार्यालयावर धाड टाकुन तपास कार्य हाती घेण्यात आले आहे.
बेळगावच्या हणमंत चिकन्नावर यांच्यासह राज्यातील चिकबळ्ळापूरचे निर्मिती केंद्र प्रकल्प संचालक कृष्णेगौडा, म्हैसूर टाउन अँड कंट्री प्लॅनिंगचे संयुक्त संचालक सुब्रमण्य के. वड्डर, चेस्कॉम म्हैसूरचे अधीक्षक अभियंता मुनीगोपाळ राजू, लक्ष्मीपुरम म्हैसूर दक्षिण येथील आरटीओ कार्यालयातील एफडीए चन्नवीरप्पा, जेस्कॉम यादगिरचे अकाउंट ऑफिसर राजू पत्तार, बीएमटीएफचे पोलीस निरीक्षक व्हिक्टर सायमन, येलाहंका विभाग बेंगलोरचे कनिष्ठ अभियंता के. सुब्रमण्यम आणि फॅक्टरीज अँड बोईलेरस दावणगिरी विभाग उपसंचालक के. एम. प्रथम यांच्या कार्यालय आणि निवासस्थानांवर एसीबीने धाडी टाकून तपास कार्य हाती घेतले आहे.