शहापूर परिसरात चार वर्षापूर्वी 1 नोव्हेंबर काळा दिनी झालेल्या दगडफेकीसंदर्भातील खटल्याच्या आज झालेल्या सुनावणीत आरोपींवर दोषारोपण अर्थात चार्ज फ्रेम होऊ शकला नाही. या खटल्याची पुढील तारीख 3 एप्रिल पडली आहे.
1 नोव्हेंबर 2016 रोजी काळ्या दिनी शहापूर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काढण्यात आलेल्या सायकल फेरीप्रसंगी दगडफेकीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलीसांनी एकूण 43 जणांवर गुन्हा दाखल केला होता. या सर्वांवर सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सरकार विरोधी घोषणा देणे, कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणे आदी आरोप ठेवण्यात आले होते.
आज बेळगाव जेएमएफसी तृतीय न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलेल्या पैकी 25 जण हजर तर उर्वरित सर्वजण गैरहजर होते. समितीच्या सदर 43 जणांपैकी दोघा जणांचे निधन झाले आहे. आजच्या सुनावणीप्रसंगी आरोपींवरील चार्ज फ्रेम होऊ शकला नाही. या खटल्याची पुढील सुनावणी येत्या 3 एप्रिल 2021 रोजी होणार आहे. सदर खटल्यात आरोपींच्यावतीने ॲड. महेश बिर्जे काम पहात आहेत.