समृद्ध गोष्टींचा विचार करा, अंतर्मूख होऊन भाषेचा विचार करा, चांगले वाचन, चांगली भाषा आणि संस्कारीत पिढी निर्माण करण्यासाठी मराठी भाषा हे प्रभावी माध्यम आहे. या सूत्राचा वापर केल्यास उत्तम शिक्षक होऊ शकतो, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले.
सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव जिल्हा (द.) आणि बालिका आदर्श विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत मराठी विषय शिक्षकांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक या नात्याने डॉ. मोरे बोलत होते. समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी तर भाषा समृद्ध आहेच, पण मातृभाषेतून दिले जाणारे ज्ञान हे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचे एक शस्त्र होऊ शकते. शिक्षकाने क्रियाशील, उपक्रमशील, सर्जनशील, चिंतनशील आणि आदर्शवत राहिल्यास भाषेत गोडी निर्माण होईल आणि आपण आपल्यासमोरील आव्हांनाना सहज सामोरे जाऊ शकू असेही डॉ. नंदकुमार मोरे पुढे म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालिका आदर्श विद्यालयाचे चेअरमन गोविंदराव फडके होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे बीटा स्पोर्ट्स क्लबचे मालक रवींद्र बिर्जे, कर्नाटक राज्य माध्यमिक संघाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी, शहराध्यक्ष संजय नरेवाडकर, खानापूर अध्यक्ष बी. ए. पाटील सर आणि ग्रामीण अध्यक्ष शिवाजी जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या मूर्तीची पूजा करुन दीप प्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे रवींद्र बिर्जे यांनी यावेळी बोलताना कार्यशाळेचे कौतुक करताना याचा उपयोग विद्यार्थ्याच्या जीवनपयोगी असावा. त्यांच्या आयुष्यांचं सोन व्हाव अस फळ या कार्यशाळेतून मिळेल असा विश्वास व्यक्त केला. रायगड शिवाजी स्मारकाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, कर्तृवाचा इतिहास उलघडत दृक् -श्राव्य माध्यमातून मनोरंजनात्मक माहिती दिली. विविध पैलूंना स्पर्श करत इतिहासाचा साक्षात्कार घडविला आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर मुलांच्या स्पर्धा घेण्याचा उद्देश बोलून दाखवला.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन फडके यांनी मराठीसाठी आपण सर्वजण एकत्रित आलात. माणूस कितीही भाषा शिकलात तरी तो मातृभाषेतच विचार करू शकतो. जगातल्या श्रीमंत भाषेत मराठी भाषेची गणना केली जाते हे आपल्यासाठी भाग्याचे आहे, असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी मराठी विषयात 100 टक्के निकाल लागलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या जिजामाता हायस्कूलच्या मराठी विषय शिक्षक पी. सी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी विद्यार्थीनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी यांनी प्रास्ताविकात जिल्हास्तरीय मराठी विषय शिक्षकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. माय मराठीची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल शिक्षण खात्यासह शिक्षक संघालाही धन्यवाद दिले. त्यानंतर चेअरमन गोविंदराव फडकेंच्या हस्ते डॉ. नंदकुमार मोरे तसेच प्रमुख पाहुणे रवींद्र बिर्जे यांचा शाल, श्रीफळ, पानविडा आणि स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. इतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पाहुण्यांचा परिचय सुजाता देसाई, अश्विनकुमार पाटील आणि विजय पार्लेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन विश्वास गावडे यांनी केले, तर आभार मंजुनाथ गोलीहळ्ळी यांनी मानले. एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी. वाय. पाटील, रणजित चौगुले, कविता चौगुले, उमेश बेळगुंदकर, नेत्रा कुलकर्णी, उषा कुंदर, आर. पी. पाटील, नितीन रेवणकर, सुरेश इटगीसह सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.