कोरोना प्रतिबंधक लस देऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक जागतिक संघटना दिवस-रात्र एक करत आहेत. औद्योगिक क्षेत्र पुन्हा प्रगतीपथावर येण्याचा प्रयत्न करत असून जागतिक क्रीडा क्षेत्र देखील पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले आहे. तथापि पुन्हा वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता बायो सिक्युअर इनव्हिराॅन्मेट अर्थात जैव सुरक्षीत वातावरणावर अधिक भर देणे गरजेचे झाले आहे.
या परिस्थितीमध्ये साऱ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेणारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. सर्वांना आश्चर्य वाटत असेल की कोरोनाग्रस्त परिस्थितीत ही मालिका कशी काय खेळविली जात आहे? पण याचे सर्व श्रेय बेळगावच्या सेंसगीझ टेक्नॉलॉजीसला जाते. सर्व क्रिकेटपटू आणि त्यांच्या सपोर्टिंग स्टाफच्या सुरक्षेसाठी “बायो बबल” अर्थात जैव फुगा यशस्वीरीत्या तैनात करणारी ही देशातील पहिली कंपनी आहे. या कसोटी क्रिकेट मालिकेत सहभागी असलेल्या सर्वांना बाहेरील जगापासून सुरक्षित ठेवणाऱ्या या बायो बबलचे नांव “सेंसगीझ सेंटिनल प्लॅटफॉर्म” असे आहे.
बायो बबलच्या परिमितीमध्ये एकाधिक साधनांची सोय करून देता येत असल्यामुळे हा स्टेडियम, हॉटेल रूम, कॉरिडोर्स, किचन, मेडिकल रूम्स, जिम, जेवणाचा विभाग आदी ठिकाणी वापरता येतो. याव्यतिरिक्त प्रत्येकासाठी (खेळाडू किंवा सपोर्टिंग स्टाफ) संवेदक उपकरणं अर्थात सेन्सर डिव्हाईस असलेला सेंसगिझ टेक्नॉलॉजीसचा खास पोषक देण्यात आला आहे. ज्याची मदत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी होणार आहे.
सध्याची कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इतक्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे अत्यावश्यकच बनते. खेळाडू आणि सपोर्टिंग स्टाफची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील बायो बबलचे व्यवस्थापन करणारी सेंसगीझ ही देशातील पहिली कंपनी असल्यामुळे ते व्यवस्थापन योग्य पद्धतीने खात्रीशीर करण्याची काळजी आम्ही घेतो, असे सेंसगीझ टेक्नॉलॉजीसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक लठ्ठे यांनी सांगितले.
आयओटी परिधान करण्यायोग्य उपकरण जागतिक आरोग्य संघटनेच्या सोशल डिस्टंसिंग नियमाचा एखाद्याने भंग केल्यास त्याची माहिती तात्काळ नियुक्त स्टाफ इन्चार्जला देते. याव्यतिरिक्त स्पर्धेदरम्यान कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास सेंसगीझ सेंटिनल प्लॅटफॉर्म मागील आठवड्यात संबंधित व्यक्ती कोणाकोणाच्या संपर्कात आली होती ते शोधून काढण्यास मदत करते. या बरोबरच संबंधितांना काॅरंटाईन करण्याबरोबरच संबंधित परिसर निर्जंतुक केला जातो.
सध्या सुरू असलेली भारत -इंग्लंड कसोटी क्रिकेट मालिकाच नव्हे तर आगामी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज (जागतिक महान खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा) या स्पर्धांना सुकुशल आणि सुरक्षित वातावरण देण्यासाठी सेंसगीझ टेक्नॉलॉजीस ही कंपनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय बरोबर भागीदार असून बेळगावसाठी ही बाब अत्यंत अभिमानाची म्हणावी लागेल.