बेळगाव शहर पाणीपुरवठा योजनेचा कारभार खाजगी कंपनीकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तेव्हा आम्हाला आमच्या नोकरीतील सुरक्षिततेची हमी दिली जावी, अशी मागणी कर्नाटक शहर पाणीपुरवठा मंडळाच्या बेळगाव महापालिका व्याप्तीत कार्य करणाऱ्या सुमारे 300 हून कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कर्नाटक शहर पाणीपुरवठा मंडळाच्या बेळगाव महापालिका व्याप्तीत कार्य करणाऱ्या शहर पाणीपुरवठा मंडळ कर्मचारी संघटनेच्यावतीने उपरोक्त मागणीचे निवेदन आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटक शहर पाणीपुरवठा मंडळाचे सुमारे 300 हून अधिक कर्मचारी बेळगाव शहर पाणीपुरवठा योजनेचे काम पाहतात.
विविध हुद्द्यांवर गेल्या 15 -20 वर्षापासून हे कर्मचारी इमानेइतबारे आपले काम करत आहेत. मात्र आता येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये बेळगाव शहर पाणीपुरवठा योजना एल अँड टी कंपनी या खाजगी उद्योग समूहाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास आपल्याला नोकरीतील सुरक्षिततेची हमी दिली जावी.
कारण खाजगी कंपनी असल्यामुळे कोणत्याही क्षणी आम्हाला कामावरून कमी केले जाऊ शकते याची गांभीर्याने दखल घेऊन येत्या 7 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला नोकरीतील सुरक्षिततेची हमी द्यावी अन्यथा 8 फेब्रुवारी 2021पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल, अशा आशयाचा तपशील व इशारा निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी शहर पाणीपुरवठा मंडळ कर्मचारी संघटनेचे सदाशिव बेण्णी, शिवगौडा पाटील, विश्वनाथ पाटील, परशराम कोकणी, सुनिता येळ्ळूरकर, श्वेता कांबळे, परशराम कांबळे, सुनिता मेत्री आदींसह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.