बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेचा फेरविचार केला जावा यासाठी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्याची सुनावणी येत्या गुरुवार दि. 4 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. कोणताही बदल न करता पुन्हा 2018 सालची वादग्रस्त प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आल्यामुळे त्याच्याविरोधात माजी नगरसेवकांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.
या दाव्याची सुनावणी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठासमोर आज सोमवारी होणार होती. मात्र आता ही सुनावणी येत्या 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
यासंदर्भात राज्यसरकारसह जिल्हाधिकारी, बेळगाव महापालिका आणि संबंधित सर्वांना नोटीस जारी झाली आहे. आता येत्या गुरुवारी होणाऱ्या या दाव्याच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.