आपल्या प्रशासकीय व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाला (व्हीटियु) मोठी किंमत मोजावी लागली आहे. गेल्या 2017 -18 सालच्या ऑडिट रिपोर्टनुसार ठराविक कामासाठी दिलेला आणि 5 वर्षाहून अधिक काळ पडून असलेल्या निधीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या विद्यापीठाला 4.91 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
आरटीआय कार्यकर्ते ॲड. सुरेंद्र उगारे यांनी माहिती हक्क अधिकार कायद्याखाली साशंकता व्यक्त केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती अशी की, शिक्षण प्रशिक्षण केंद्र, मूल्यांकन केंद्र, पदव्युत्तर अभ्यासक्रम आदी सुरू करण्यासाठी दावणगिरी येथील कुरुंदवाड रस्त्याशेजारील जागा खरेदी करण्यासाठी गेल्या 4 नोव्हेंबर 2011 रोजी व्हीटीयुने 10.57 कोटी रुपयांची (10,57,79 125 रू.) रक्कम एका धनादेशाद्वारे कर्नाटक हाऊसिंग बोर्डला (केएचबी) देऊ केली होती. पुढे कांही कारणास्तव संबंधित जमीन व इमारत व्हीटियुकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया झालीच नाही. त्यानंतर केएचबीने संबंधित रक्कम 19 एप्रिल 2017 रोजी म्हणजे 5 वर्षाच्या खंडानंतर व्याजाविना (हिशोबाने 4.91 कोटी रु.) परत केली.
ऑडिट रिपोर्टनुसार व्हीटियुकडून केएचबीला देण्यात आलेल्या रकमेवरील 4 नोव्हेंबर 2011 ते 19 एप्रिल 2017 या 5 वर्षे 4 महिन्याच्या कालावधीचे व्याज 4 कोटी 91 लाख 16 हजार 773 रुपये इतके होते. ऑडिट कमिटीने याबाबत 4 सप्टेंबर 2019 रोजी विद्यापीठाच्या प्रशासनाला याची कल्पना देऊन सदर नुकसान भरपाई मिळविण्यासाठी कारवाई करण्याचा सल्ला दिला होता. तसेच आवश्यक कागदपत्रेही देऊ केली होती. प्रत्युत्तरादाखल संबंधित व्याज अदा करावे यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून देखील केएचबी प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे विद्यापीठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात स्पष्टीकरण मागण्यासाठी व्हीटियुचे उपकुलगुरू डॉ. करीसिद्दप्पा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.