विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयु) हे दिवसेंदिवस जणू घोटाळ्यांचे आगरच बनत चालले आहे. सध्या उघड झालेला ताजा घोटाळा म्हणजे, गेल्या 2017 -18 या वर्षातील पावत्या व दिलेली रक्कम तसेच जमाखर्च यांच्यातील तफावतीमुळे समोर आलेली कोट्यावधी रुपयांच्या निधीची अफरातफर हा होय.
आरटीआय कार्यकर्ता सुरेंद्र उगारे यांनी ऑडिट रिपोर्टसंदर्भात गोळा केलेल्या माहितीनुसार, कागदपत्रात नमूद असलेल्या प्रत्यक्ष खर्चापेक्षा उत्पन्न आणि खर्चाच्या रकाण्यामध्ये अतिरिक्त 39,48,98,891 रुपयांची (39.48 कोटी) अतिरिक्त रक्कम दाखविण्यात आली आहे. उत्पन्न आणि खर्चाच्या रकाण्यानुसार एकूण 151,93,49,918 रुपयांची (151.93 कोटी) रक्कम ही पुस्तके व नियतकालिका, छपाई खर्च, पुनरुज्जीवन, पगार, वीज, भाडे आदी महसूल संबंधी 37 गोष्टींवर खर्च म्हणून नमूद आहेत.
परंतु पावती आणि दिलेल्या रकमेचे रकाणे तपासले असता संबंधित बाबींवर खर्च झालेली प्रत्यक्ष रक्कम 112,44,51,027 रुपये (112 कोटी) इतकी नमूद असल्याचे दिसून येते. यावरून उत्पन्न आणि खर्चाच्या रकाण्याची पावती आणि दिलेल्या रकमेच्या रकाण्याशी तुलना केली असता अतिरिक्त 39,48,98,891 रुपयांची (39.48 कोटी) तफावत दिसून येते.
ऑडिट कमिटीने इतक्या मोठ्या तफावतीबद्दल विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडे तीव्र आक्षेप नोंदविला आहे. विद्यापीठाचे शैक्षणिक उपक्रम, आर्थिक मदत, प्राध्यापक विकास कार्यक्रम, एआययु/सीडब्ल्यूयु साठी सदस्यत्व वर्गणी, युवा महोत्सव खर्च यासह वैद्यकीय परतफेड, प्राध्यापक भत्ता हे सर्व उत्पन्न आणि खर्चाचा यादीत दाखवण्यात आले आहेत. परंतु पावत्या आणि दिलेल्या रकमेच्या केश आउट लिस्टमध्ये त्यांचा पत्ताच नाही. गेल्या 20 ऑगस्ट 2019 रोजी ऑडिट कमिटीने उत्पन्न आणि खर्च तसेच पावती आणि दिलेली रक्कम यामधील मोठ्या रकमेच्या तफावती संदर्भात स्पष्टीकरण मागितले होते.
त्याला व्हीटीयूच्या अधिकाऱ्यांनी 6 नोव्हेंबर 2019 रोजी उत्तर देताना ऑडिट कमिटीच्या मताशी सहमती दर्शवली आहे. यावरून विद्यापीठाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याचे स्पष्ट होते. यासाठी ऑडिट कमिटीने तफावतीची 39.48 कोटी रुपयांची रक्कम आक्षेपार्ह ठेवली आहे. यासंदर्भात व्हीटीयुचे उपकुलगुरू डॉ. करिसिद्धाप्पा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.