कोरोनाविषाणू प्रादुर्भावावर मात करण्यासाठी आरोग्य खात्याच्यावतीने पहिल्या टप्प्यात कोरोना वॉरियर्स वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्यानंतर आता महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतीबंधक लस देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लस वितरित करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात कोरोना वॉरियर्सना लस देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली गेली.
आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना लस देण्यास प्रारंभ झाला आहे. महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची यादी आरोग्य खात्याला देण्यात आली होती. मात्र कार्यालयीन कर्मचाऱ्यांची यादी देण्यात आली नव्हती. मात्र सर्वांनाच लस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लस दिल्यानंतर तिचे दुष्परिणाम होतात असा गैरसमज स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये देखील निर्माण झाला होता. तथापि लसीबाबतचा त्यांचा गैरसमज दूर करून लस देण्यात येत आहे.
महापालिकेच्या कार्यालयीन अधिकाऱ्यांनाही लस घेणे बंधनकारक आहे. या अधिकाऱ्यांसह महापालिकेतील कर्मचाऱ्यांना शनिवारपासून लस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.