गरीब गरजूंची दोन वेळची जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने रेशनकार्डवर दरमहा स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे आता दुचाकी गाडी, टीव्ही, फ्रीज आदी असणाऱ्या लाभार्थींचे रेशनकार्ड रद्द होणार असल्याची माहिती नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी दिली आहे.
मंत्री उमेश कत्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार अंमलबजावणी झाल्यास लाखो पेक्षा जास्त रेशनकार्डे रद्द होण्याची शक्यता असून संबंधितांच्या तोंडचा हक्काचा घास हिरावला जाणार आहे. यामुळे समस्त जनतेमध्ये सरकारविरुद्ध संतापाची लाट उमटत आहे. या नव्या फतव्यामुळे वाहने असलेल्या अनेक गरीब कुटुंबांवर श्रीमंतीचा शिक्का मारून त्यांची रेशनकार्ड रद्द केली जाण्याची भीती आहे. तुमच्या मालकीची 5 एकर जमीन, टीव्ही, फ्रीज, दुचाकी किंवा चारचाकी गाडी असेल आणि रेशनकार्डवर तुम्ही स्वस्त धान्य घेत असाल तर लवकरच तुमचा धान्य पुरवठा बंद होऊ शकतो.
ग्रामीण भागामध्ये अनेकदा शेतीच्या कामासाठी किंवा दूध विकण्यासाठी दुचाकी घेतली जाते. परंतु दुचाकी घेतली म्हणून ती व्यक्ती श्रीमंत होत नाही. शहरी भागात देखील अनेक गरीब कुटुंब पै-पै जमा करून अथवा कर्ज काढून प्रवासी वाहतुकीसाठी किंवा कामाला जाण्यासाठी दुचाकी खरेदी करतात. आता अशा रेशनकार्ड धारकांचे हक्काचे स्वस्त धान्य मिळणे बंद होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात ज्यांचे उत्पन्न वाढेल त्यांचे रेशनकार्ड रद्द करुन नवीन लाभार्थींना जोडण्यात येणार आहे. अपात्र रेशनकार्ड धारकांचा शोध घेऊन त्यांचे रेशनकार्ड रद्द करण्याची सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आली आहे.
सरकार एप्रिलनंतर कार्डधारकांचा आढावा घेईल. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे सर्व सुविधा असतील आणि बीपीएल कार्ड देखील असेल त्यांना दंड ठोठावण्याचा इशाराही देण्यात आला आहे.