पार्वतीनगर, जैतनमाळ येथील कल्पना शक्ती यांच्या फर्निचर टिंबर डेपोला भीषण आग लागून सुमारे 35 लाख रुपयांचे सागवान व शिसम जातीचे किंमती लाकूड भस्मसात झाल्याची घटना आज रविवारी सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास घडली.
सदर फर्निचर टिंबर डेपो शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांचे ज्येष्ठ बंधू कल्पनाशक्ती फर्निचर शोरूमचे गोविंदराव शिरोळकर यांच्या मालकीचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पार्वतीनगर, जैतनमाळ येथे असणाऱ्या सदर खुल्या फर्निचर टिंबर डेपोच्या मागे मोठे मोकळे रान आहे. हे सुमारे 10 -15 एकरमध्ये पसरलेले रान आज भल्या पहाटे कुणीतरी पेटवून दिले होते.
ज्ञान प्रबोधन शाळेकडून पेटता आलेल्या या रानातील आगीच्या संपर्कात टिंबर डेपो आला. सदर डेपो खुल्या स्वरूपाचा असल्यामुळे वाऱ्यामुळे डेपोतील लाकडांनी लागलीच पेट घेऊन अल्पावधीत आगीने भीषण स्वरूप घेतले आणि बघता बघता डेपोतील लाकुड साठा आणि फर्निचर आगीमध्ये जळून खाक झाले.
आगीचा प्रकार लक्षात येताच टिंबर डेपोच्या वॉचमनने तात्काळ आपले मालक गोविंदराव शिरोळकर आणि प्रकाश शिरोळकर यांना घटनेची माहिती दिली. शिरोळकर यांनी अग्निशामक दलाला आगीची माहिती देऊन त्वरित घटनास्थळी धाव घेतली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाने सुमारे 4 तासाच्या महत्प्रयासानंतर आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला सुमारे सात-आठ पाण्याच्या बंबांचा वापर करावा लागल्याचे समजते.
आगीत भस्मसात झाले लाकूड सागवान आणि शिसम जातीचे होते. फर्निचर कामासाठी दांडेली वगैरे ठिकाणी असलेल्या गव्हर्मेंट डेपोमधून आपण ते खरेदी करून आणले होते. आगीत भस्मसात झालेल्या लाकडांचा हिशोब केला जात असून त्यानंतर निश्चित किंमत समजणार आहे तथापि माझ्या अंदाजानुसार 30 ते 35 लाख रूपयांचे लाकूड आगीत जळाले आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना दिली.