खानापूर तालुक्यातील हेम्माडगा गावाच्या परिसरात एका वाघाचा वावर सुरू झाला असून या वाघाने बऱ्याच पाळीव जनावरांचा फडशा पाडल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या पंधरा दिवसात या वाघाने 29 हून अधिक गाई -बैलांचा बळी घेतला आहे.
हेम्माडगा गांव भीमगड वन्यजीव अभयारण्यात असून सध्या या गावाच्या परिसरात संबंधित वाघाची दहशत निर्माण झाली आहे. सदर वाघ वयस्कर झाला असावा त्यामुळेच जंगलातील हरण, सांबर आदी प्राण्यांना आपले भक्ष बनविणे त्याला शक्य नसल्यामुळे तो नागरी वसाहतीतील कमकुवत पाळीव प्राण्यांना आपले लक्ष्य करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
हेम्माडगा येथील श्रीकांत नारायण मादार यांच्या गाईला वाघाने ठार केल्यामुळे त्यांचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनखात्याकडून आम्हाला नुकसानभरपाई दिली जाते, परंतु ती फारच अल्प असल्याचा आरोप मादार यांनी केला आहे.
दरम्यान, मुख्य वनसंरक्षणाधिकारी बी. व्ही. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जंगला नजीकच्या गावातील लोकांनी आपली पाळीव जनावरे जंगलामध्ये चरण्यासाठी सोडू नयेत याबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. याखेरीज जंगलात वावरताना गटागटाने रहा, असेही स्थानिकांना सांगितले जात आहे.
शिकार प्रतिबंधक शिबिर, गस्ती पथकाची नियुक्ती आदी विविध उपक्रम खानापूर तालुक्यातील जंगल प्रदेशानजीक असलेल्या गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविले जात आहेत.