एका महाविद्यालयीन युवतीचा लाकडे फोडताना तुटलेला डाव्या हाताचा अंगठा पूर्ववत जोडण्याची शस्त्रक्रिया आपण आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडली असल्याची माहिती विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे प्रमुख डॉ. रवी पाटील यांनी दिली.
शहरात आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये डॉ. पाटील यांनी उपरोक्त माहिती दिली. सौंदत्ती तालुक्यातील गुर्लकोळ गावातील हेमा नांवाच्या पदवीपूर्व प्रथम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीचा हाताचा तुटलेला अंगठा शस्त्रक्रियेद्वारे पूर्ववत जोडण्यात आला आहे. डॉ. रवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी कॉलेजला जाण्याच्या घाईगडबडीत लाकडे फोडताना हेमाचा डाव्या हाताचा अंगठा तुटला. अंगठा तुटून लोंबकळत असलेल्या अवस्थेत हेमाच्या कुटुंबीयांनी तिला त्वरित स्थानिक डॉक्टरांकडे नेले. तेंव्हा त्या डॉक्टरांनी त्यांना डॉ. रवी पाटील यांचे बेळगाव येथील विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर गाठण्याचा सल्ला दिला. हेमाच्या कुटुंबियांनी वेळ न दवडता तात्काळ बेळगाव गाठून हेमाला विजया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी देखील डॉ. रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर अंगठ्याची शस्त्रक्रिया करून तो पूर्ववत जोडला. या शस्त्रक्रियेमुळे अंगठा गमवावा लागणार की काय? असे वाटणाऱ्या हेमा आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सदर शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ. विठ्ठल, डॉ. सिंधू, डॉ. हालेश, डॉ सुवीन आदींचे सहकार्य लाभल्याचे सांगून डॉ रवी पाटील यांनी शरीराचा बोटे, हात-पाय, कान असा कोणताही अवयव तुटल्यास वेळीच शस्त्रक्रिया झाल्यास तो पूर्ववत जोडता येतो असे सांगितले.
एखादा अवयव तुटून शरीरापासून अलग झाला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. अवयव तुटल्यानंतर त्यातील रक्तवाहिन्या जवळपास दोन-तीन तास जिवंत असतात. या कालावधीत रुग्णाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवून शस्त्रक्रिया केल्यास संबंधित अवयव पूर्ववत जोडला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी अपघात घडल्यानंतर संबंधित तुटलेला अवयव घटनास्थळी सोडून न देता त्याच्यासह तात्काळ हॉस्पिटल गाठणे आवश्यक आहे. शक्य असेल तर तुटलेला अवयव स्वच्छ धुऊन प्लॅस्टिक पिशवीत घालून बर्फात ठेवून आणावा.
हॉस्पिटलकडे निघण्यापूर्वी आपण येत असल्याची कल्पना हॉस्पिटलमधील डॉक्टरांना द्यावी. जेणेकरून डॉक्टरांना आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करून तात्काळ शस्त्रक्रिया करणे सुलभ जाते असे सांगून तुटलेले अवयव पूर्ववत यशस्वीरीत्या जोडण्याच्या अनेक शस्त्रक्रिया आपण यापूर्वी केल्या असल्याची माहिती डॉ. रवी पाटील यांनी दिली.