घरफोडी करणारे त्रिकूट गजाआड : कारसह 18.59 लाखाचे दागिने जप्त- बेळगाव जिल्ह्यात विविध 12 ठिकाणी घरफोडीसह देवस्थानांमध्ये चोरी करणाऱ्या एका त्रिकुटाला यमकनमर्डी पोलीसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडील 18 लाख 59 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि एक कार गाडी जप्त केली आहे.
संतोष गंगाराम वड्डर (रा. अरभावी), विशाल नरसिंग शेरखान आणि गिरीश चंद्रकांत पोतदार (दोघे रा. कोल्हापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत गोकाक, पाच्छापूर, यमकनमर्डी, बेळगाव माळमारुती, मारिहाळसह जिल्ह्यात विविध 12 ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या आणि देवस्थानात चोरी केल्याच्या आरोपावरून या त्रिकुटाला यमकनमर्डी पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडील 18 लाख 59 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली एक कार गाडी जप्त केली. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील जिनराळ क्रॉसनजीक संशयास्पदरित्या फिरणाऱ्या संतोष वड्डर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडी आणि चोरीची कबुली दिली.
संतोष वड्डर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हिडकल क्रॉस जवळील कोल्हापूरच्या विशाल नरसिंग शेरखान तसेच गिरीश चंद्रकांत पोतदार या दोघांनी चोरीचे दागिने खरेदी केले होते. तेंव्हा त्या दोघांना देखील पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडील चोरीचे सोन्याचांदीचे दागिने आणि कार जप्त केली.
अटक केलेल्या आरोपींना हुक्केरी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बी. व्ही. नेर्ली, विठ्ठल नायक, के. वाय. कलादगी, महेश करगुप्पी, गडेगोदप्पगोळ, एस. व्ही. शेख आदींनी उपरोक्त कारवाई केली.