राज्यभरात शाळा – महाविद्यालयांना सुरुवात झाली असून, या काळात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बससेवा सुरळीत सुरु ठेवण्याचे आवाहन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांना केले असून यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले आहे.
यासंदर्भात परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांना देण्यात आलेल्या निवेदनात , विद्यार्थ्यांना बससुविधेसाठी लागणारा बसपास आणि इतर सोयी पुरविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी सरकारी बससेवेवर अवलंबून असणारे विद्यार्थी आहेत. परंतु बससेवा नसल्याकारणाने अनेक विद्यार्थी शाळेत गैरहजर असल्याचेही निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून बससेवा नियमित आणि सुरळीत सुरु करण्याची सूचना या निवेदनात करण्यात आली आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा महाविद्यालये पूर्ण वेळ सुरु असून अपेक्षेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची हजेरी दिसून येत आहे. अद्यापही कोरोना परिस्थिती पूर्णपणे निवळली नाही. शाळा सुरु झाल्यानंतर अनेक विद्यार्थी विविध पर्याय निवडून शाळेत येत आहेत.
परंतु इतर विद्यार्थी बसविणे शाळेत पोहोचत नाहीत. तर काही ठिकाणी बसची वाट पाहून वेळेत बस न मिळाल्याने विद्यार्थी घरी परतत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन परिवहन मंडळाने विद्यार्थ्यांना सोय पुरवावी, असे निवेदन करण्यात आले आहे.
परिवहन मंडळाने दहावी, बारावी परीक्षेदरम्यान खूप सहकार्य केले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. आताही परिवहन मंडळाने पुढाकार घ्यावा, आणि विद्यार्थ्यांना सुरळीत बससेवा पुरवावी, असे निवेदनात मंत्री सुरेशकुमार यांनी नमूद केले आहे.