ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून तू त मै मै सुरु असून या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुन्हा रमेश जारकीहोळीना निवडणुका आणि सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर डिवचले असून आगामी निवडणुकीत रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात उभं राहून निवडणूक लढविण्याचे आणि जिंकण्याचे वक्तव्य केले आहे.
त्यांच्या या वक्तव्याला रमेश जारकीहोळी यांनीही प्रतिटोला लगावला असून लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला असून मला कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवता येते, असे जारकीहोळीनंनी स्पष्ट केले आहे.
बेळगावमधील सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या कि, रमेश जारकीहोळी हे नेहमीच ग्रामीण मतदार संघात हस्तक्षेप करतात. ग्रामीण मतदार संघाला टार्गेट करण्यात येते. परंतु मी रमेश जारकीहोळीना प्रत्त्युत्तर देण्यासाठी समर्थ असून गोकाक मतदारसंघातही यापुढे आम्ही हस्तक्षेप करून योग्य ते प्रत्त्युत्तर देऊ. रमेश जारकीहोळींच्या आरोपांवर मी गप्प बसणार नाही.
शिवाय त्यांच्या प्रश्नांना मतदार संघातील जनताच प्रत्त्युत्तर देईल, असे त्या म्हणाल्या. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने पुन्हा संधी दिल्यास, रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचे हेब्बाळकरांनी सांगितले.
अनेक ग्रामपंचायत सदस्य आणि राज्यातील चार ते पाच ठिकाणचे आमदार काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हा प्रवेश केला जात नाही तर या लोकप्रतिनिधींना ‘हायजॅक’ करण्यात येत आहे. राज्यभरात भाजपाचीच सत्ता आहे, जिल्ह्यात त्यांची सत्ता आहे, परंतु त्यांचा लोकशाहीवरील विश्वास कमी झाला आहे, त्यामुळे असे प्रकार घडवून आणत असल्याचा आरोपदेखील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.
तर दुसऱ्या बाजूला रमेश जारकीहोळी यांनी लक्ष्मी हेब्बाळकरांना प्रतिटोला लगावला असून लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाला सूट आहे. त्यामुळे माझ्या मतदार संघात सर्वांचे स्वागत आहे. मी कोणत्याही मतदार संघात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण मी केवळ आमदार नाही मी एक मंत्री आहे. जिल्हा पालकमंत्री या नात्याने प्रत्येक मतदार संघात लक्ष देणे हे माझे कर्तव्य आहे. माझी जबाबदारी आहे. असे प्रत्त्युत्तर रमेश जारकीहोळी यांनी दिले.