कोरोना प्रादुर्भावामुळे ठप्प झालेली विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर गेल्या जून 2020 ते डिसेंबर 2020 या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये बेळगाव विमानतळावरून विमानांच्या 3,984 फेऱ्या झाल्या असून याद्वारे 1 लाख 55 हजार 800 प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिली.
लॉक डाऊन समाप्तीनंतर बेळगाव विमानतळाने केलेल्या प्रगतीसंदर्भात बेळगाव लाईव्हने मौर्य यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी उपरोक्त माहिती दिली. राजेशकुमार मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉक डाऊन नंतर गेल्या 25 मे 2020 पासून बेळगाव विमानतळावरील प्रवासी विमान वाहतूक पुनश्च सुरू झाली. मेअखेर म्हणजे सहा -सात दिवसांमध्ये बेळगाव विमानतळावरून विमानांची 26 वेळा आगमन आणि उड्डाणे झाली. तसेच 445 प्रवाशांनी विमान प्रवासाचा लाभ घेतला. या पद्धतीने प्रारंभी 445 इतकी असणारी प्रवाशांची संख्या आणि 26 इतकी असणारी विमान फेऱ्यांची संख्या पुढे वाढत जाऊन डिसेंबर अखेर विमान फेऱ्यांची संख्या 763 आणि प्रवाशांची संख्या 34 हजार 213 इतकी झाली आहे.
बेळगाव विमानतळावरून गेल्या जून महिन्यापासून दरमहा प्रवास केलेल्या प्रवाशांची संख्या आणि विमान फेर्या अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत. जून : प्रवासी 10346 -विमान फेर्या 386, जुलै : प्रवासी 14500 -विमान फेर्या 443, ऑगस्ट : प्रवासी 18281 -विमान फेर्या 421, सप्टेंबर : प्रवासी 23045 -विमान फेर्या 519, ऑक्टोंबर : प्रवासी 26201 -विमान फेर्या 652, नोव्हेंबर : प्रवासी 30326 -विमान फेर्या 767, डिसेंबर : प्रवासी 34213 -विमान फेर्या 763.
विमान सेवेबद्दल माहिती देताना राजेशकुमार मौर्य यांनी उडान योजनेअंतर्गत बेळगावला 13 शहरे विमानसेवेसाठी मिळाली आहेत. यापैकी 12 शहरांची विमानसेवा सुरू असून बेंगलोर येथे देखील नॉन आरसीएस सेवा सुरू आहे. या पद्धतीने बेळगाव एकूण 13 प्रमुख शहरांशी हवाई वाहतुकीद्वारे जोडले गेले आहे. आता उडान अंतर्गत नागपूर आणि जयपूर येथे विमानसेवा सुरू होणे बाकी आहे. यापैकी नागपूर विमानसेवा येत्या 16 मार्च रोजी सुरू होणार आहे. जयपुर बाबत अद्याप घोषणा झालेले नाही. शहर निहाय पाहता उडान अंतर्गत बेळगावहून अजून दोन शहरांसाठी विमान सेवा सुरू होणे बाकी आहे.
बेळगाव येथून संबंधित शहरांसाठी ज्या विमान कंपन्यांची विमानसेवा सुरू आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. पुणे -अलायन्स एअरलाइन्स. हैदराबाद -इंडिगो, ट्रू जेट, स्पाईसजेट. म्हैसूर, तिरुपती, कडप्पा, हैदराबाद -ट्रू जेट. मुंबई, हैदराबाद -स्पाइस जेट. स्टार एअर कंपनीला 9 शहरे मिळाली आहेत. सध्या यापैकी 6 शहरांसाठी विमानसेवा सुरू असून नागपूर, जयपूर व तिरुपती या शहरांना स्टार एअरची विमानसेवा सुरू होणे अद्याप बाकी आहे. हे दोन मार्ग सुरू व्हावयाचे असल्याने स्टार एअर वगळता उडान योजनेअंतर्गत उर्वरित सर्व विमान कंपन्यांची विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरु आहे. यासाठीच प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत राज्यात बेंगलोर आणि मंगळूनंतर बेळगाव तळाला तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळाचा मान मिळाला आहे.
सध्याच्या घडीला बेळगाव विमानतळावर दररोज 14 विमानांचे आगमन आणि 14 विमानांचे उड्डाण अशा एकूण 28 विमान फेर्या होत आहेत. एकंदर लॉक डाऊननंतर विमानसेवा पुनश्च सुरु झाल्यापासून 7 महिन्याच्या कालावधीमध्ये बेळगाव विमानतळावरून विमानांच्या 3,984 फेऱ्या झाल्या असून याद्वारे 1 लाख 55 हजार 800 प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती राजेशकुमार मौर्य यांनी दिली.