राज्यातील शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला असून येत्या 22 फेब्रुवारी 2021 पासून इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे शालेय वर्ग सुरू करण्यास राज्याच्या कोविड तांत्रिक सल्लागार समितीने परवानगी दिली आहे.
विधानसभेमध्ये शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये राज्याच्या कोविड तांत्रिक समितीने इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे शालेय वर्ग सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.
त्याचप्रमाणे 22 फेब्रुवारीपासून इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग पुर्ववत भरविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. एकंदर राज्यातील बंद असलेल्या प्राथमिक शाळांचा पुनर्रारंभ होण्यास मुहूर्त लागला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सर्वकाही सुरळीत होऊ लागले आहे. त्यामुळे प्राथमिक वर्गाच्या शाळा देखील सुरू व्हाव्यात अशी मागणी केली जात होती. सध्या इयत्ता नववी ते दहावीचे वर्ग पूर्णवेळ भरत असून इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग विद्यागम अंतर्गत एक दिवस आड सुरू होते.
त्यामुळे फक्त इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या निर्णयाबाबत प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा आता संपली असून येत्या 22 फेब्रुवारीपासून हे वर्ग पूर्ववत सुरू होणार आहेत.